जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी २४ कॅरेट सोन्याने उच्चांक केला होता. मंगळवारी पुन्हा मोठी दरवाढ नोंदवण्यात आल्याने सोन्याने पुन्हा नवा सर्वकालीन उच्चांक केला. सोन्याच्या दरवाढीमुळे मोठी उलथापालथ झाल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

नवीन वर्षाच्या आगमनापूर्वीच जळगावातील सराफा बाजारात सोन्याच्या किमतींनी मोठी उसळी घेतल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यात दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर काही दिवस सोने स्थिरावले होते. मात्र, नवीन आठवड्याच्या सुरुवातीपासूनच पुन्हा एकदा बाजारात हालचाल आणि सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. सोन्याचे दर दिवसागणिक नवनवे ऐतिहासिक उच्चांक गाठत असल्याने ग्राहकांसह सराफा व्यावसायिकही चक्रावले आहेत. अचानक वाढलेल्या दरांमुळे खरेदीसाठी आलेले ग्राहक संभ्रमात पडले असून, अनेकांनी खरेदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, गुंतवणूकदार मात्र भविष्यातील वाढीच्या अपेक्षेने सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहेत.

स्थानिक सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी तसेच डॉलरमधील चढउतार, महागाईची भीती आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल, यामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याच बरोबर लग्नसराईचा हंगाम, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर होणारी खरेदी आणि सणासुदीची मागणी यांचाही दरवाढीवर परिणाम होत असल्याचे व्यावसायिक सांगतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दररोज वाढत आहेत. दरवाढीचा हा आलेख असाच कायम राहिला, तर येत्या काही दिवसांत सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम दीड लाखांच्या आसपास सहज पोहोचू शकतो, असा अंदाज काही सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला. पुढील काळाक किती आणि कसे दर वाढणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, वाढत्या दरांचा परिणाम दागिन्यांच्या विक्रीवरही दिसून येत आहे. हलक्या वजनाच्या दागिन्यांना हळूहळू मागणी वाढत असून, ग्राहक आर्थिक बजेटनुसार कमी किमतीचे दागिने खरेदी करताना दिसत आहेत. काही जण जुन्या दागिन्यांची देवाणघेवाण करून नवीन घडणावळीचे दागिने घेण्यावर भर देत आहेत. ग्राहक नवीन दागिने खरेदीसाठी दुकानांमध्ये येत आहेत. परंतु, खरेदी करण्याऐवजी ते फक्त किंमत विचारत आहेत आणि निघून जात आहेत. याचा थेट परिणाम सराफा व्यापारावर झाला आहे आणि विक्रीत लक्षणीय घट होत आहे. लग्नसराईत सोने विक्री वाढण्याच्या आशेवर असलेल्या सुवर्ण व्यावसायिकांची त्यामुळे निराशा झाली आहे.

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेतही सोमवारी दिवसभरात १९५७ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३८ हजार २० रूपयांच्या नवीन उच्चांकापर्यंत पोहोचले होते. सोन्याने शहरात १५ डिसेंबरला एक लाख ३७ हजार ५०५ रूपयांचा उच्चांक केला होता. त्यानंतर सोमवारी मागील उच्चांक मोडीत काढून सोने पुन्हा ऐतिहासिक उच्चांकाकडे झेपावले. अपेक्षेनुसार, मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर तब्बल २२६६ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४० हजार २८६ रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकापर्यंत मजल मारली.