जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदविण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात चढ-उतार सुरू असताना शनिवारी झालेल्या घसरणीमुळे दागिने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. दर कमी झाल्याने सराफ बाजारात ग्राहकांची खरेदीबाबतची उत्सुकता वाढल्याचे चित्र आहे.

जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफ बाजारावरही होत आहे. अमेरिकन डॉलरची स्थिती, बॉण्ड यील्ड्समधील बदल, व्याजदरांबाबतच्या अपेक्षा तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी यामुळे सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. जळगावच्या बाजारपेठेतही त्याचे पडसाद उमटत असून, शनिवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यास डॉलरमध्ये व्यवहार होणारे सोने इतर चलनांमधील गुंतवणूकदारांसाठी तुलनेने महाग होते. त्यामुळे सोन्याच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो. त्याचवेळी अमेरिकन बॉण्ड यील्ड्स वाढल्याने गुंतवणुकदारांचा कल व्याज देणाऱ्या मालमत्तांकडे वाढण्याची शक्यता असते. परिणामी सोन्यावर विक्रीचा दबाव निर्माण होऊ शकतो. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाकडे सध्या बाजाराचे लक्ष आहे. व्याजदर तुलनेने उच्च पातळीवर राहिल्यास सोन्यासाठी परिस्थिती आव्हानात्मक ठरू शकते. याशिवाय महागाईचे आकडे, अमेरिकन डॉलरची दिशा आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यांचाही सोन्याच्या दरावर परिणाम होणार आहे.

दीर्घकालीन आधार कायम

तज्ज्ञांच्या मते, अल्पावधीत सोन्यावर दबाव असला तरी केंद्रीय बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी आणि गुंतवणुकीची मागणी हे सोन्यासाठी महत्त्वाचे आधार ठरू शकतात. त्यामुळे सध्याच्या घसरणीकडे पाहताना अल्पकालीन आणि दीर्घकालीन घटक वेगवेगळे विचारात घेणे आवश्यक आहे. आगामी काळात डॉलर, बॉण्ड यील्ड्स आणि अमेरिकेच्या व्याजदर धोरणातील बदल सोन्याच्या किमतीची दिशा ठरविणारे प्रमुख घटक ठरण्याची शक्यता आहे.

सोन्याच्या दरात किती घट?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी ५१५ रुपयांची वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५३,९८५ रुपयांपर्यंत होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर १४४२ रुपयांची घट नोंदविण्यात आली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५२,५४३ रुपयांपर्यंत खाली आले.

चांदीच्या दरात किती घट?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी कोणतीही घडामोड न झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,३१,७५० रुपयांवर स्थिरावले होते. मात्र, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर १०३० रुपयांची घट नोंदविण्यात आली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३०,७२० रुपयांपर्यंत खाली आली.