जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली. रक्षाबंधन उद्यावर आले असताना दोन्ही धातू अचानक स्वस्त झाल्याने दागिन्यांसह भेटवस्तू खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांना त्यामुळे बऱ्यापैकी दिलासा मिळाला.
अमेरिकेतील महागाईची ताजी आकडेवारी आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव घसरून सुमारे ४,६०० डॉलर प्रति औंसच्या आसपास आला आहे. जुलैमध्ये अमेरिकेचा वैयक्तिक उपभोग खर्च म्हणजेच पीसीई निर्देशांक ३.७ टक्क्यांवर राहिला. हा दर फेडरल रिझर्व्हच्या २ टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे अमेरिकेतील महागाईचा दबाव अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. महागाई अपेक्षेपेक्षा जास्त राहिल्यास फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करण्याऐवजी ते वाढवण्याचा किंवा उच्च पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते. यामुळे सप्टेंबरच्या फेड बैठकीकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.
तज्ज्ञांच्या मते, व्याजदर वाढण्याची शक्यता वाढल्याने गुंतवणूकदारांचा कल सोन्याऐवजी अमेरिकन बॉण्ड्स आणि डॉलरकडे वाढतो. कारण व्याज न देणाऱ्या सोन्याच्या तुलनेत बॉण्ड्समधून नियमित परतावा मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे सोन्याची गुंतवणूक म्हणून असलेली आकर्षकता काही प्रमाणात कमी होते. महागाईची आकडेवारी मजबूत आल्यानंतर अमेरिकन डॉलरमध्येही सुधारणा झाली.
सोन्याचे आंतरराष्ट्रीय व्यवहार डॉलरमध्ये होत असल्याने डॉलर मजबूत झाल्यास इतर चलनांतील गुंतवणूकदारांसाठी सोने तुलनेने महाग होते. परिणामी मागणी कमी होऊन सोन्याच्या किमतीवर दबाव येतो. मात्र सध्याची घसरण ही सोन्याच्या दीर्घकालीन तेजीचा अंत मानणे योग्य ठरणार नाही. जागतिक आर्थिक अनिश्चितता, भूराजकीय तणाव, केंद्रीय बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी हे घटक अजूनही महत्त्वाचे आहेत. भारतीय बाजारावरही याचा परिणाम होऊ शकतो. महागाई कमी होण्याचे संकेत मिळाल्यास सोन्याला पुन्हा आधार मिळू शकतो; मात्र महागाईचा दबाव कायम राहून व्याजदर वाढीची शक्यता वाढली तर सोन्यावर आणखी दबाव येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
सोन्याचे दर किती कमी झाले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी २१६३ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६६,६५४ रुपयांपर्यंत खाली आले होते. सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी १८५४ रुपयांची घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६४,८०० रुपयांपर्यंत घसरले. दोनच दिवसांत तब्बल ४०१७ रुपयांची घट सोन्यात नोंदवली गेली.
चांदीचे दर किती कमी झाले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी ४१२० रुपयांची घट झाल्याचे चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,५४,४१० रुपयांपर्यंत खाली आले होते. सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी ४१२० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,५०,२९० रुपयांपर्यंत घसरली. दोनच दिवसांत तब्बल ८२४० रुपयांची घट चांदीत नोंदवली गेली.
