Jalgaon Gold Silver Price Drop Today : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग दोन दिवस सोने आणि चांदीचे दर वधारल्याने ग्राहकांची चिंता वाढली होती. मात्र, गुरूवारी सकाळी बाजार उघडल्यावर दोन्ही धातुंचे दर चांगलेच आपटले. विशेषतः चांदी मोठ्या प्रमाणात घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. मोठे चढउतार लक्षात घेता सुवर्ण व्यावसायिक मात्र चक्रावले.
गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने, चांदीच्या किमतींमध्ये मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. या अस्थिरतेचा फटका सामान्य ग्राहकांपासून ते मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांनाच बसत आहे. विशेषतः लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने आत्ता सोने घ्यावे की थांबावे?” हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव, मध्यपूर्वेतील अस्थिरता तसेच जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहू लागले आहेत. देशात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरांमध्ये तीव्र चढउतार दिसून आले.
एखाद्या दिवशी सोन्याच्या दरात जोरदार वाढ झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी घसरण होत असल्याचे चित्र आहे. या घसरणीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना आणि लग्नासाठी दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना थोडीफार दिलासा मिळाल्याचे दिसते. मात्र, दरातील अस्थिरतेमुळे अनेक ग्राहक खरेदीचा निर्णय देखील पुढे ढकलत आहेत. आज सोने घेतले तर उद्या भाव पडतील का? किंवा थांबलो तर भाव आणखी वाढतील का?, असा संभ्रम ग्राहकांमध्ये निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय तणाव, डॉलरची हालचाल, अमेरिकेचे व्याजदर धोरण आणि जागतिक आर्थिक संकेत यावर सोने, चांदीच्या दराची पुढील दिशा अवलंबून असेल.
सोने किती स्वस्त झाले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी ८२४ रूपयांची सुधारणा झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५७ हजार ३८४ रूपयांपर्यंत पोहचले होते. बुधवारी दिवसभरात आणखी ५७६८ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६३ हजार १५२ रूपयांपर्यंत वधारले होते. मात्र, गुरूवारी सकाळी बाजार उघडताच ४०१७ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५९ हजार १३५ रूपयांपर्यंत घसरले.
चांदी किती स्वस्त झाली?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी ५१५० रूपयांची सुधारणा झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८० हजार १६० रूपयांपर्यंत पोहचले होते. त्यानंतर बुधवारी दिवसभरात आणखी १८ हजार ५४० रूपयांची वाढ नोंदवण्यात आल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ९८ हजार ७०० रूपयांपर्यंत वधारले होते. मात्र, गुरूवारी सकाळी बाजार उघडल्यावर तब्बल २५ हजार ७५० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७२ हजार ९५० रूपयांपर्यंत घसरली.

