जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळालेले नकारात्मक संकेत, अमेरिकी डॉलरची मजबुती आणि गुंतवणूकदारांकडून झालेली नफा वसुली यांचा थेट परिणाम दोन्ही धातुंच्या किमतींवर झाल्याने सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली. गेल्या आठवड्यात सर्वकालीन उच्चांकावर पोहचलेल्या सोन्याच्या दरात सोमवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) जवळपास आठ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली, तर चांदीच्या दरात १५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
सातत्याने वाढणारे दर अचानक घसरल्याने बाजारात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. जागतिक पातळीवर डॉलर मजबूत झाल्याने सोन्या-चांदीसारख्या कमोडिटीजवरील दबाव आता वाढला आहे. त्याचबरोबर, उच्च पातळीवर पोहचलेल्या किमती पाहता अनेक गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी विक्रीचा मार्ग स्वीकारला आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारातही विक्रीचा जोर वाढून दोन्ही धातुंच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. अर्थसंकल्पानंतर अपेक्षित सकारात्मक संकेत न मिळाल्याने आणि जागतिक घटकांच्या प्रभावामुळे सोने-चांदीच्या बाजारात मोठी घट झाल्यानंतर इतके दिवस सोने-चांदीच्या खरेदीपासून लांब राहिलेल्या ग्राहकांचा उत्साह आता वाढला आहे. सुवर्ण व्यावसायिकांमधूनही त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले.
सोन्याचे दरात किती घसरण ?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी १० हजार ८१५ रूपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ७२ हजार रूपयांपर्यंत घसरले होते. शनिवारी आठवड्याच्या शेवटी देखील ८२४० रूपयांची घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६३ हजार ७७० रूपयांपर्यंत खाली आले होते. सलग दोन दिवस मोठी घसरण झाल्यानंतर सोमवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी १३ हजार ९०५ घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४९ हजार ८६५ रूपयांपर्यंत खालावले. २९ जानेवारीला सोन्याच्या दराने एक लाख ८२ हजार ८२५ हजाराचा उच्चांक केला होता. त्यानंतरच्या चार दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल ३२ हजार ९६० रूपयांची घट नोंदवली गेली.
चांदीच्या दरात किती घसरण ?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी तब्बल ५६ हजार ६५० रूपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो तीन लाख ५० हजार २०० रूपयांपर्यंत घसरले होते. शनिवारी आठवड्याच्या शेवटी देखील ४१ हजार २०० रूपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो तीन लाख ९ हजार रूपयांपर्यंत आली आले होते. सलग दोन दिवस मोठी घसरण झाल्यानंतर सोमवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी ५३ हजार ५६० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ५५ हजार ४४० रूपयांपर्यंत खालावले. २९ तारखेला चांदीने चार लाख ६ हजार ८५० रूपयांचा उच्चांक केला होता. त्यानंतरच्या चार दिवसांत तब्बल एक लाख ५१ हजार ४१० रूपयांची घट नोंदवली गेली आहे.

