जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरु आहेत. दोन्ही धातुंचे दर कमी होण्याची वाट पाहणाऱ्या ग्राहकांचा त्यामुळे मोठा भ्रमनिरास झाला असून, काही केल्या सोने दीड लाख आणि चांदी अडीच लाखांच्या खाली येण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे.

मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ जागतिक बाजारपेठांवर स्पष्टपणे परिणाम करत आहे. आणि त्याचे प्रतिबिंब सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातुंमध्येही दिसून येत आहे. गुंतवणूकदार अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित पर्यायांकडे वळतात, त्यामुळे सोन्याला विशेषतः मागणी वाढते. अमेरिकन बँकेच्या विश्लेषणानुसार, येत्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यांनी यासाठी विशिष्ट लक्ष्य किंमतही निश्चित केली आहे. चांदीही या प्रवाहात मागे राहणार नसून तिच्याही किमतीत वाढ अपेक्षित आहे. अलीकडील काळात सोन्याच्या किमतींमध्ये झालेली वाढ ही एका महिन्याच्या नीचांकी पातळीवरून झालेली सुधारणा मानली जात आहे. यामागे काही महत्त्वाचे घटक आहेत. फेडरल रिझर्व्हने व्याजदर अपरिवर्तित ठेवण्याचा घेतलेला निर्णयही बाजारासाठी सकारात्मक ठरला आहे. यामुळे आर्थिक धोरणात स्थैर्याचा संकेत मिळतो, पण त्याचवेळी जागतिक तणाव कायम असल्याने सोन्याच्या किमतींना आधार मिळत राहतो. एकूणच जागतिक राजकीय आणि आर्थिक अनिश्चितता, गुंतवणूकदारांची सुरक्षिततेची गरज आणि चलनविषयक बदल या सर्व घटकांमुळे सोन्याच्या किमती पुढील काळातही मजबूत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेतही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी १९ एप्रिलला २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५७,६९३ रुपयांपर्यंत, तर चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,६७,८०० रुपयांपर्यंत होते. त्यानंतर सतत चढ-उतार सुरु राहिल्याने ३० एप्रिलअखेर सोन्याचे दर १,५४,९१२ रुपये, तर चांदीचे दर २,५१,३२० रुपयांपर्यंत स्थिरावले. सोन्यात २७८१ आणि चांदीत १६,४८० रुपयांची घट नोंदवली गेली. परंतु, अक्षय्य तृतीयेनंतर दर कमी होण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या ग्राहकांचा विशेषतः सोन्याच्या बाबतीत मोठा भ्रमनिरास झाला. मे महिन्याची सुरूवात झाल्यानंतरही फार दखलपात्र घट न झाल्याने सोने आणि चांदीचे दर तोऱ्यातच आहेत. मोठ्या प्रमाणात चढ-उतार होऊनही सोन्याचे दर दीड लाखांच्या खाली तसेच चांदीचे दर अडीच लाखांच्या खाली आलेले नाही.

सोन्याचे दर आता किती?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मे महिन्याच्या पहिल्या तारखेला शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५५,५३० रुपयांपर्यंत पोहचले होते. दुसऱ्याच दिवशी शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर १२३६ रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५४,२९४ रुपयांपर्यंत खाली आले. अर्थात, फार काही घट न झाल्याने सोन्याच्या दर घसरणीने ग्राहकांचे समाधान झाले नाही.

चांदीचे दर आता किती?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मे महिन्याच्या पहिल्या तारखेला शुक्रवारी चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,६०,५९० रुपयांपर्यंत पोहचले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर ३०९० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,५७,५०० रुपयांपर्यंत खाली आले. मात्र, दरात फार काही घट न झाल्याने चांदीचे दर आवाक्याबाहेर राहिल्याने ग्राहकांनी सावध भूमिका घेतली.