जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीचे दर आवाक्यात आल्याने ग्राहकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत पुन्हा दोन्ही धातुंचे दर वधारले आहेत. विशेषतः चांदीची तीन लाखांकडे वाटचाल सुरू झाली आहेत.
३१ जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत सलग तीन दिवस आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या तीव्र घसरणीनंतर आता सोने आणि चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. तीन फेब्रुवारीपासून दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये तेजी दिसून येत असून, बुधवारी देखील सलग दुसऱ्या दिवशी दरवाढ कायम राहिली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत २.३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. डॉलरमध्ये मजबुती असूनही गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल पाहायला मिळत आहे. स्पॉट गोल्डचा दर प्रति औंस ५,०५४.७५ डॉलरवर पोहोचला आहे. मागील काही दिवसांत झालेल्या मोठ्या घसरणीनंतर ही दरवाढ बाजारासाठी दिलासादायक मानली जात आहे.
चांदीच्या किमतीतही बुधवारी मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीचा दर २.६१ टक्क्यांनी म्हणजेच २.२२ डॉलरने वाढून प्रति औंस ८७.३३ डॉलरवर व्यवहार करत आहे. औद्योगिक मागणीत सुधारणा आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे चांदीच्या दरांना आधार मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आगामी काळात जागतिक आर्थिक घडामोडी, मध्यवर्ती बँकांचे व्याजदर धोरण, तसेच भू-राजकीय तणाव यांचा सोने-चांदीच्या किमतींवर मोठा प्रभाव राहणार आहे. अल्पकालीन चढ-उतार संभवत असले तरी दीर्घकालीन दृष्टीने या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये स्थिरता आणि मजबुती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोन्याचे दर आता किती?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी ७२१० रूपयांची घट नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५६ हजार ५६० रूपयांपर्यंत घसरले होते. परंतु, मंगळवारी दिवसभरात ८२४ रूपयांची सुधारणा झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५७ हजार ३८४ रूपयांपर्यंत पोहचले. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सकाळी बाजार उघडताच आणखी तब्बल ६७९८ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६४ हजार १८२ रूपयांपर्यंत वधारले.
चांदीच्या दराची काय स्थिती?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी ३३ हजार ९९० रूपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७५ हजार १० रूपयांपर्यंत घसरले होते. मात्र, मंगळवारी दिवसभरात पुन्हा ५१५० रूपयांची सुधारणा झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८० हजार १६० रूपयांपर्यंत पोहचले. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी १३ हजार ३९० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ९३ हजार ५५० रूपयांपर्यंत वधारले.

