जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी सोने, चांदीचे दर कमी झाल्याने ग्राहकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला होता. मात्र, अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबवून तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा करताच बुधवारी सकाळी दोन्ही धातुंच्या दराने पुन्हा आकाशाला गवसणी घातली. दागिने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांना त्यामुळेच चांगलाच घाम फुटला.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तात्पुरत्या युद्धविरामामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठांमध्ये मोठी हालचाल दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेऐवजी सावध आशावाद निर्माण झाला आहे. या घडामोडीचा सर्वाधिक परिणाम मौल्यवान धातूंवर विशेषतः सोने आणि चांदी यांच्यावर झाला आहे. युद्धविरामाच्या बातमीनंतर सोन्याच्या किमतींमध्ये अचानक वाढ झाली. स्पॉट गोल्ड सुमारे २.३ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ४,८११ डॉलरपर्यंत पोहोचले, तर अमेरिकन गोल्ड फ्युचर्समध्ये ३.३ टक्क्यांनी वाढ होऊन ते ४,८४० डॉलरवर गेले. हे वाढलेले दर गुंतवणूकदारांच्या बदलत्या मानसिकतेचे स्पष्ट संकेत देतात. सामान्यतः युद्धकाळात किंवा भू-राजकीय तणाव वाढल्यावर सोने सुरक्षित गुंतवणुक म्हणून खरेदी केले जाते, पण या वेळी युद्धविरामानंतरही त्याची मागणी वाढली आहे.

यामागचे मुख्य कारण म्हणजे बाजारातील अनिश्चितता पूर्णपणे दूर झालेली नाही. युद्धविराम तात्पुरता असल्यामुळे भविष्यात पुन्हा तणाव वाढू शकतो, अशी भीती गुंतवणूकदारांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.

चांदीच्या किमतींमध्येही मोठी उसळी दिसून आली. चांदी सुमारे ४.६ टक्क्यांनी वाढली आहे. औद्योगिक वापर आणि गुंतवणूक या दोन्ही कारणांमुळे चांदीची मागणी वाढल्याचे दिसून येते. दुसरीकडे, तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे. युद्धाचा धोका कमी झाल्यामुळे पुरवठा खंडित होण्याची भीती कमी झाली असून, त्यामुळे तेल बाजारावर दबाव आला आहे. यामुळे ऊर्जा क्षेत्रात काही प्रमाणात स्थिरता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच पाहता, या युद्धविरामामुळे बाजारात मिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. एका बाजूला तणाव कमी होण्याची आशा आहे, तर दुसऱ्या बाजूला भविष्यातील अनिश्चितता कायम आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत असून सुरक्षित मालमत्तांमध्ये विशेषतः सोने आणि चांदी गुंतवणूक वाढवत आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर हा युद्धविराम दीर्घकाळ टिकला, तर पुढील काही आठवड्यांत बाजार अधिक स्थिर होऊ शकतो. मात्र, परिस्थिती पुन्हा बिघडल्यास सोन्याच्या किमतींमध्ये आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोन्याचे दर किती वधारले?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी २०६ रुपयांची किंचित वाढ झाल्याने सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५३,९८५ रुपयांपर्यंत पोहचले होते. तर मंगळवारी दिवसभरात १३०९ रुपयांची घट झाल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५२,६७६ रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर ५१२० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५७,७९६ रुपयांपर्यंत वधारले.

चांदीचे दर किती वधारले?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी ३०९० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,४८,२३० रुपयांपर्यंत पोहचले होते. तर मंगळवारी दिवसभरात ४१२० घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,४४,११० रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर तब्बल १३,३९० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,५७,५०० रुपयांपर्यंत वधारले.