जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १५०० रुपयांपेक्षा अधिक, तर चांदीत प्रति किलो पाच हजारांपेक्षा अधिक घट नोंदवली गेली होती. सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही धातुंच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना सुखद धक्का बसला.
सध्या सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे. कधी दर झपाट्याने वाढतात, तर कधी अचानक घसरण होते. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लग्नसराईच्या काळात सुवर्ण बाजारपेठेत दागिन्यांची खरेदी वाढल्याने सोन्याला काही प्रमाणात आधार मिळतो. आणि किमतीत तेजी दिसून येते. मात्र, अलीकडच्या काळात सोन्याच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे खरेदीस इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी ती एक चांगली संधी ठरत आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवली गेली आहे.
सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांचे लक्ष सध्या अमेरिकेत जाहीर होणाऱ्या महागाईच्या आकडेवारीकडे लागले आहे. हीच आकडेवारी फेडरल रिझर्व्ह पुढील काळात व्याजदरांबाबत कोणती भूमिका घेणार आहे, याबाबत संकेत देऊ शकते. त्यामुळे येत्या काळात सोने आणि चांदीच्या दरांची दिशा तेथील आर्थिक घडामोडींवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बाजारातील परिस्थिती सतत बदलत असल्याने ग्राहकांनी घाईघाईत निर्णय न घेता सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक आहे.
सोने नेमके किती घसरले ?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी १०३० रूपयांची वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६२ हजार ७४० रूपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, गुरुवारी दिवसभरात १५४५ रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६१ हजार १९५ रूपयांपर्यंत खाली आले. तर शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी २५७५ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५८ हजार ६२० रूपयांपर्यंत घसरले.
चांदी नेमकी किती घसरली ?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी ३१०० रूपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७८ हजार १०० रूपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, गुरुवारी ५१५० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७२ हजार ९६० रुपयांपर्यंत खाली आले. तर शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी तब्बल १५ हजार ४५० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ५७ हजार ५०० रूपयांपर्यंत घसरले.

