जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी दिवसभरात चांदीचे दर चार लाखांवर, तर २४ कॅरेट सोन्याचे दर एक लाख ८० हजारांवर पोहोचले होते. परंतु, शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातुंच्या दरात मोठी घसरण झाली. उच्चांकी दरवाढीला अचानक ब्रेक लागल्याने ग्राहकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला.
दोन्ही मौल्यवान धातुंच्या बाजारात शुक्रवारी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. गेल्या काही सत्रांत सातत्याने विक्रमी पातळी गाठल्यानंतर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये अचानक मोठी घसरण झाली. बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा-वसुली केल्याने सोने आणि चांदीच्या किमती दबावाखाली आल्या. विशेषतः चांदीच्या दरांमध्ये तीव्र घसरण नोंदवली गेली. सोन्याच्याही किमती काही क्षणांत लक्षणीयरीत्या खाली आल्या. सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, अलिकडच्या काळातील झपाट्याने झालेली दरवाढ पाहता अनेक गुंतवणूकदारांनी नफा कमावण्याचा निर्णय घेतला, ज्याचा थेट परिणाम बाजारावर झाला.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर भू-राजकीय तणावात काहीसा दिलासा मिळाल्याची चिन्हे दिसत आहेत. टॅरिफ विषयक तणाव कायम असतानाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत अणुकरारासाठी पुढाकार घेतल्याच्या बातमीने बाजारातील भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीवरील मागणीवर परिणाम झाला आहे. तरीही आगामी काळात सोने-चांदीच्या किमती अस्थिर राहण्याची शक्यता आहे. जागतिक घडामोडी, डॉलरची हालचाल आणि व्याज दरांबाबतचे संकेत यावर पुढील दिशा अवलंबून असेल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय न घेता सावध आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
सोन्याच्या दरात किती घट ?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी ५९७४ रुपयांची वाढ झाल्याने २४ कॅरेटचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ७० हजार ४४५ रुपयांपर्यंत पोहचले होते. गुरूवारी दिवसभरात पुन्हा १२ हजार ३६० रुपयांची वाढ झाल्याने सोने प्रति १० ग्रॅम एक लाख ८२ हजार ८२५ रुपयांच्या उच्चांकापर्यंत पोहचले. मात्र, शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यावर ७७२५ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ७५ हजार १०० रूपयांपर्यंत घसरले.
चांदीच्या दरात किती घट ?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी २५ हजार ७५० रुपयांची वाढ नोंदवली गेल्यानंतर चांदीच्या दराचा जीएसटीसह प्रति किलो तीन लाख ८६ हजार २५० रुपयांचा सर्वकालीन उच्चांक नोंदविण्यात आला होता. दुसऱ्याच दिवशी गुरुवारी दिवसभरात आणखी २० हजार ६०० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो चार लाख सहा हजार ८५० रूपयांपर्यंत पोहचले. दोन दिवसातील उच्चांकी दरवाढ लक्षात घेता सर्वांचे लक्ष शुक्रवारकडे लागले होते. प्रत्यक्षात, शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच तब्बल १५ हजार ४५० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो तीन लाख ९१ हजार ४०० रूपयांपर्यंत घसरले.

