जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी गुरूवारी सकाळी दोन्ही धातुंच्या दरात पुन्हा मोठी घट नोंदवली गेल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.

तज्ज्ञांच्या मते, दिवाळीपासून सोने आणि चांदीच्या किमतीत मोठे चढ-उतार पाहण्यास मिळाले आहेत. हा ट्रेंड जगभरात दिसून येत आहे आणि जागतिक सराफा बाजारात सोन्याचे भाव सातत्याने घसरत आहेत. धनतेरस ते लक्ष्मीपूजनाच्या कालावधीतील सोन्याच्या किमती पाहता सोन्यात तब्बल १० रुपयांचा फरक दिसून येतो.

येत्या काळात सोन्याच्या किमतीत आणखी पाच ते १० टक्के घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. तरीही गुंतवणूकदारांना सोने पुन्हा त्याच्या सर्वोच्च पातळीजवळ पोहोचण्याचा विश्वास वाटतो आहे. त्यादृष्टीने त्यांच्याकडून सोन्याच्या दरात आणखी सुधारणा होण्याची वाट पाहिली जात आहे.

दरम्यान, सोन्याच्या किमती कमी होण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे शी जिनपिंग यांच्यातील बैठकीदरम्यान अमेरिका-चीनमध्ये व्यापार करार होण्याची अपेक्षा, हे मुख्य कारण मानले जात आहे. याशिवाय, सुरक्षित आश्रयस्थान म्हणून डॉलर मजबूत होत आहे. भारत, कोरिया आणि इतर देशांसोबतच्या व्यापार करारांबद्दल अमेरिका सकारात्मक दिसत आहे. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर सोन्याचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त झाला आहे. कमी किमतीत सोन्यात गुंतवणूक करणारे आता विक्री करण्याच्या मानसिकतेत दिसत आहेत. लग्नाचा हंगाम पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. परंतु ज्यांना दागिने खरेदी करायचे आहेत त्यांनी ते आधीच खरेदी करून ठेवले आहेत.

जळगाव शहरातही मंगळवारी ३८११ रूपयांची घट नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २२ हजार ३६४ रुपयांपर्यंत घसरले होते. मात्र, बुधवारी दिवसभरात आणखी २२६६ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २४ हजार ६३० रूपयांपर्यंत पोहोचले. तर गुरूवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १५४५ घट नोंदवली गेली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २३ हजार ०८५ रूपयांपर्यंत खाली आले.

चांदीत २००० रूपयांनी घट

शहरात मंगळवारी ६१८० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदी एक लाख ४९ हजार ३५० रुपयांपर्यंत घसरली होती. मात्र, बुधवारी दिवसभरात आणखी ५१५० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५४ हजार ५०० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचली. सुदैवाने गुरूवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा २००० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५२ हजार ४४० रूपयांपर्यंत घसरली.