जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरूवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २८००, तर चांदीत प्रति किलो सात हजारांपेक्षा अधिक दरवाढ नोंदवली गेली होती. शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा दोन्ही धातुंच्या दरात मोठा बदल झाल्याचे दिसून आले.
कमकुवत अमेरिकन डॉलर आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांच्या नकारात्मक टिप्पण्यांमुळे शुक्रवारी सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमती संमिश्र दिसून आल्या. देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या किमती थोड्या कमकुवत झाल्या. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या ओढीमुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा चर्चेत आले. शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी, सोन्याने वर्षअखेरीस मजबूत आघाडी कायम ठेवली आहे. चढ-उतार सुरू असतानाही सोन्याच्या किमती ऐतिहासिक विक्रमांच्या जवळ जात आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष किमतीवर केंद्रित झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
जळगाव शहरात बुधवारी ३०९ रूपयांची किंचित घट नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २७ हजार ७२० रूपयांपर्यंत खाली आले होते. परंतु, गुरूवारी दिवसभरात तब्बल २८८४ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३० हजार ६०४ रूपयांपर्यंत पोहोचले होते. शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच १२३६ रूपयांची घट नोंदवली गेली. परिणामी, सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख २९ हजार ६६८ रूपयांपर्यंत खाली आले.
सोन्याचे दर का वाढले ?
जागतिक बाजारपेठेत गेल्या काही दिवसांत अनेक कारणांमुळे सोन्याचे दर वाढले आहेत. अमेरिकेतील व्याजदरात घट झाल्यामुळे सोने हा एक चांगला गुंतवणूक पर्याय बनला आहे. शिवाय, एक्सचेंज-ट्रेडेड फंड्समध्ये वाढता प्रवाह आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची खरेदी सुरू राहिल्याने किमती आणखी मजबूत झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत सोन्याने अनेक वेळा विक्रमी उच्चांक गाठला आहे. जरी त्यात थोडीशी घसरण झाली असली तरी, सोने गेल्या काही वर्षातील सर्वात मोठ्या वार्षिक तेजीच्या मार्गावर अजूनही आहे.
चांदीत ३०९० रूपयांनी घट
शहरात बुधवारी १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह एक लाख ६२ हजार ७४० रूपयांपर्यंत पोहोचले होते. गुरूवारी दिवसभरात आणखी ७२१० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ६९ हजार ९५० रूपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच ३०९० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर एक लाख ६६ हजार ८६० रूपयांपर्यंत खाली आले.
