जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळाला होता. बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा दोन्ही धातूंच्या दरात घट नोंदविण्यात आल्याने ग्राहकांना सुखद धक्का बसला.

देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरातील चढ-उतार सुरूच असून सलग तिसऱ्या आठवड्यात मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण नोंदविण्यात आली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीच्या शक्यता आणि डॉलरच्या मजबुतीमुळे मौल्यवान धातूंवर दबाव कायम असल्याचे चित्र आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत असून बुधवारी सोने आणि चांदी दोन्हींच्या किमतीत घट झाली. आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजार कॉमेक्सवरही किमतीत सुमारे ०.३८ टक्क्यांची घसरण झाल्याने सोन्याचा दर १६ डॉलरने घसरून प्रति औंस ४,१४१ डॉलर इतका नोंदविण्यात आला. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही ०.४२ टक्क्यांची घट झाली असून, चांदीचा भाव प्रति औंस ६१.०७० डॉलर या पातळीवर व्यवहार करत आहे.

जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर सातत्याने होत आहे. विशेषतः अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याने गुंतवणूकदारांचा कल सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीऐवजी डॉलरकडे वळत आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील महागाई आणि व्याजदरासंदर्भातील धोरणांबाबतची अनिश्चितता देखील सोन्याच्या दरावर परिणाम करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहक दरांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अलीकडील घसरणीमुळे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जाणकारांचा हा सल्ला

अल्पकालीन घसरण असली तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोन्याचे महत्त्व कायम आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सध्याचा काळ अनुकूल ठरू शकतो. तसेच, चांदीच्या दरात झालेली घसरणही औद्योगिक वापर आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने खरेदीदारांसाठी आकर्षक संधी निर्माण करत आहे. पुढील काही दिवसांत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरासंदर्भातील निर्णय, डॉलर निर्देशांकातील हालचाल आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर सोन्या-चांदीच्या किमतींची दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवूनच खरेदी किंवा गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा, असा सल्ला जाणकारांनी दिला आहे.

सोन्याचे दर आता किती?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी १३३९ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४९,७६२ रुपयांपर्यंत खाली आले होते. तर मंगळवारी आणखी ९२७ रुपयांची घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४८,८३५ रुपयांपर्यंत घसरले होते. बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा १०३ रुपयांची किरकोळ घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४८,७३२ रुपयांपर्यंत घसरले.

चांदीचे दर आता किती?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी १०३० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,४३,०८० रुपयांपर्यंत खाली आले होते. तर मंगळवारी आणखी ४१२० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३८,९६० रुपयांपर्यंत घसरली होती. बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा ३०९० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३५,८७० रुपयांपर्यंत घसरली.