जळगाव : शहरातील तीन नामांकित सुवर्ण पेढ्यांमध्ये अडीच महिन्यांपूर्वी हातचलाखी करून सोन्याच्या अंगठ्या लंपास करणाऱ्या महिलेला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक करून लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्यानंतर आता पुन्हा एका नामांकित सुवर्ण पेढीतून सुमारे २.५ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
संशयित महिलेने गेल्या वर्षी २७ ऑक्टोबर रोजी सर्वात आधी जळगाव शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्समध्ये चोरीचा यशस्वी डाव आखला होता. सदर महिलेने अंगठ्या ठेवलेल्या ट्रेमधून सोन्याच्या अंगठ्या गायब करून त्यांच्या जागी दोन नकली अंगठ्या ठेवल्याचे सेल्समन गिरीश जैन यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी करण्यात आली. सीसीटीव्हीमध्ये एक महिला सोने खरेदीच्या बहाण्याने शोरूममध्ये आली होती.सेल्समन इतर डिझाईनचे ट्रे आणण्यासाठी खाली वाकताच तिने स्वतःकडील टॅग लावलेल्या दोन नकली अंगठ्या ट्रेमध्ये ठेवल्या. आणि सुमारे एक लाख ८५ हजार रुपये किमतीच्या दोन अस्सल सोन्याच्या अंगठ्या चोरून ती पसार झाली.
याशिवाय, शहरातील भंगाळे ज्वेलर्समध्येही २७ ऑक्टोबर रोजी महिलेने हातचलाखी करत सुमारे १३ ग्रॅम वजनाची सुमारे एक लाख ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेली होती. अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरात दोन वेगवेगळ्या दुकानांतून सुमारे ३० ते ३५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार जळगावमधीलच पु. ना. गाडगीळ सुवर्ण पेढीतूनही २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान एका महिलेने सुमारे १० ग्रॅम वजनाची, एक लाख ४० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरी केल्याचे उघडकीस आले होते.
दरम्यान, आता पुन्हा शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या नामांकित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स या शोरूममध्ये धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका अज्ञात चोरट्याने सुमारे दोन लाख ४९ हजार ६१५ रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ असताना एका अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, कोणाचीही संमती न घेता लबाडीच्या इराद्याने २२ कॅरेट शुद्धतेची सोन्याची चैन चोरून नेली. ही बाब लक्षात येताच शोरूममध्ये मोठी खळबळ उडाली. शोरूमचे व्यवस्थापक गणेश राजाराम काळे यांनी याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी पुढील तपासाला गती दिली आहे.
