नाशिक – कर्करोगाचा (कॅन्सर) धोका सातत्याने वाढत असतानाच या आजारावरील सर्वात मोठा अडसर आजही लवकर निदानासाठी लागणारा खर्च ठरत असल्याचे दिसून येते. भारतात कर्करोगाची लक्षणे असलेल्या सुमारे ६० टक्क्यांहून अधिक रुग्णांकडे प्राथमिक तपासण्यांसाठी आवश्यक पैसे नसतात, तर महाराष्ट्रातही हीच परिस्थिती असून सुमारे ५५ ते ६० टक्के रुग्ण आर्थिक कारणांमुळे निदानास विलंब करत असल्याचे दिसून येते. परिणामी, अनेक रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात उपचारासाठी दाखल होतात. हे लक्षात घेऊन इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये कर्करोग निदानासाठी लागणाऱ्या तपासण्या मोफत करण्यात आल्या आहेत.

कर्करोग सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना २५ हजार रुपयांपर्यंतच्या तपासण्या पूर्णतः मोफत केल्या जात असून, या सुविधेचा लाभ आतापर्यंत हजारो रुग्णांनी घेतल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही सेवा सोमवार ते शनिवार उपलब्ध आहे. रुग्ण थेट बाह्यरुग्ण विभागात किंवा आदिवासी व दुर्गम भागात आयोजित आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून प्राथमिक तपासणी करून हॉस्पिटलमध्ये या तपासण्यांसाठी लाभ घेत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मुंबईच्या प्रख्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत झालेला करार आणि याठिकाणी पूर्णवेळ उपलब्ध असलेले टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर यामुळे एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा ग्रामीण भागातच उपलब्ध झाल्या आहेत. एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिटयूटमध्ये टाटा मेमोरियलच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची अनुभवी टीम कार्यरत आहे. यामध्ये मेडिकल ऑन्कोलॉजीसाठी डॉ. संदीप इशी, सर्जिकल ऑन्कोलॉजीसाठी डॉ. विनायक शेनगे व डॉ. अंबरीश चॅटर्जी, बालरोग कर्करोगासाठी डॉ. पिंकी शाह–काळे, तर हेमॅटो ऑन्कोलॉजीसाठी (ब्लड कॅन्सर) डॉ. गिरीश बदरखे सेवा देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

कर्करोग निदानासाठी लागणाऱ्या रक्त तपासण्या, बायोप्सी, सीटी स्कॅन, एमआरआय अशा तपासण्यांचा खर्च अनेकांना परवडत नसल्याने निदान उशिरा होत होते. मात्र, एसएमबीटीच्या आरोग्य शिबिरांमधून आणि रुग्णालयातील मोफत तपासणी योजनेमुळे कर्करोगाची लक्षणे असलेले रुग्ण वेळेत शोधण्यात यश मिळत असून, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करता येत आहेत. याठिकाणी केवळ सामान्य कर्करोगच नव्हे, तर रक्तविकार कर्करोगांवर मायलोमा आणि ल्युकेमिया उपचार केले जात आहेत. खर्चिक मानल्या जाणाऱ्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया अल्पदरात केल्या जात असून, आधुनिक उपचारपद्धतींपैकी एक असलेली कार-टी सेल थेरपी देखील येथे अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकर निदान झालेला कुठलाही कर्करोग बरा होतो यासाठी हॉस्पिटल प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

लवकरच पेट स्कॅन, रेडीएशन थेरपी

लवकरच एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पेट स्कॅन आणि रेडिएशन थेरपी सुविधा सुरू होणार असून, त्यामुळे कर्करोग निदान अधिक अचूक आणि उपचार अधिक प्रभावी ठरणार आहेत. ज्यामुळे रुग्णाला उपचारांसाठी बाहेर कुठेही जावे लागणार नाही.
-सचिन बोरसे (सीइओ, एसएमबीटी हॉस्पिटल)