नाशिक : अन्नदाता सुखी असेल तर देश सुखी आणि समृद्ध असतो. प्रयोगशील शेतकरी हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. राज्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये, ते कर्जाच्या ओझ्याखाली भरडले जाता कामा नये, याचा गांभीर्यपूर्वक विचार होत आहे. जो संपूर्ण देश आणि राज्याला जगवतो, त्या शेतकऱ्याचे जगणे सुखकर करण्यासाठी राज्य सरकार काम करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
राज्यात कृषी, फलोत्पादनसंलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन, उत्पन्नवाढीसाठी योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना सोमवारी कृषी विभागाच्या वतीने येथे विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांतील पुरस्कारांचे वितरण या वेळी झाले. या सोहळय़ात मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईहून आभासी पद्धतीने संवाद साधला. येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ आदी उपस्थित होते.
करोनाच्या काळात शेतकऱ्यांनी राज्याचे अर्थचक्र कायम राखले. निर्बंध असताना शेतकरी शेतात मेहनत करीत होते. त्यामुळे करोनानंतर अन्नधान्यांच्या टंचाईचे संकट उद्भवले नसल्याकडे ठाकरे यांनी लक्ष दिले. शेतकऱ्याचे जीवन सुखकर करण्यासाठी राज्यात सत्तेत येताच दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना साहाय्य करण्यात आले. विकेल ते पिकेल या योजनेद्वारे कृषिमालास हमखास भाव मिळवून दिला जात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे विकेल तेच पिकवायला हवे. कमी वेळेत, कमी पाण्यावर, रोगाला बळी न पडणारे वाण आता विकसित करायला हवे, असे सांगितले. त्यासाठी राज्यातील ५० वर्षे पूर्ण करणाऱ्या दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांना ५० कोटी संशोधनासाठी शासनामार्फत दिले जाणार आहेत. सेंद्रिय औषधांच्या निर्मितीसाठी संशोधन आणि त्याचा वापरही वाढवावा लागेल. उसाची शेती किफायतशीर होण्यासाठी शेतातील ऊस संपेपर्यंत कारखाने चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून कारखान्यांना त्यासाठी अनुदानही देण्यात येणार आहे. पुण्यात कृषी भवनच्या जुन्या इमारतीची नवनिर्मिती केली जाणार आहे. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजावर पवार यांनी तिरकसपणे बोट ठेवत हवामानाची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्राची नवीन ओळख निर्माण करा -राज्यपाल
एकीकडे अत्यंत प्रगत तर दुसरीकडे अत्यंत प्राथमिक अवस्थेत असणारी शेती आपल्याला दिसते. हे चित्र बदलायचे असेल तर कृषी विद्यापीठांमधील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून ते मातीत अवतरायला हवे. तसेच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राची देशाच्या कृषी क्षेत्राची राजधानी म्हणून नवीन ओळख निर्माण करा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महाराष्ट्रात शेतीचे नवनवीन प्रयोग होत आहेत. काही प्रयोगांना जी.आय. टॅगिंगही मिळाले आहे. सेंद्रिय शेती व बाजाराच्या मागणीप्रमाणे पीक पद्धतीचा अवलंब केल्याने चारपटीने उत्पन्नात वाढ झाल्याची तसेच शेतीमाल अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांत निर्यात झाल्याची उदाहरणे आपण पाहिल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले अनुभव, ज्ञान इतर शेतकरी बांधवांना देऊन त्यांना पुढे न्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुरस्कार रकमेत पाचपट वाढ
शेतकरी राजाच देशाचे खरे वैभव असून त्यांच्या प्रचंड मेहनतीचे मोल पुरस्काराच्या रकमेतून होऊ शकत नाही. कृषी पुरस्कारांची रचना दशकभरापूर्वीची आहे. त्यात वाढ करण्याच्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या सूचनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगेच निर्णय घेतला. राज्याच्या कृषी पुरस्कारांमध्ये पाचपटीने वाढ करण्याची घोषणा त्यांनी केली.