मालेगाव : बागलाण तालुक्यातील महड येथे अचानक तब्येत बिघडून एकाच कुटुंबातील आजोबा आणि नातूचा मृत्यू होणे तसेच सून आणि नातीची तब्येतही गंभीर असणे, याविषयीचे गूढ अजून कायम आहे. चौघा सदस्यांच्या तब्येत बिघडण्याचे आणि त्यातील दोघांचा मृत्यू होण्यामागील कारणांचा आरोग्य आणि पोलीस यंत्रणा शोध घेत आहेत

बाळू शिवा सोनवणे (६५) आणि हरी अनिल सोनवणे (१२) अशी मृत्यू झालेल्या आजोबा आणि नातूची नावे आहेत. नंदा अनिल सोनवणे (३५) आणि नेहा अनिल सोनवणे (१६) या सून आणि नातीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयीन सूत्रांकडून सांगण्यात आले. सोनवणे कुटूंब हे महड शिवारात शेतात वास्तव्यास आहे. दहा दिवसांपूर्वी रात्री जेवण झाल्यावर बाळू सोनवणे, पत्नी सखुबाई, नातू हरी आणि नात नेहा असे चौघे जण पत्र्याच्या घरातील खोलीत झोपी गेले. त्यांचा मुलगा अनिल हा पत्नी नंदासह दुसऱ्या खोलीत झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हरी यास मळमळ, चक्कर येणे, डोळे झापडबंद होणे, बोलता न येणे असा त्रास सुरू झाला. दोन तासांनी नेहाला आणि दुपारच्या सुमारास बाळू सोनवणे यांनाही तसाच त्रास सुरू झाला. नामपूर आणि मालेगाव येथे प्राथमिक उपचार केल्यावर त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. नंतर सोनवणे यांना पुणे येथील सैनिकी रुग्णालयात नेण्यात आले. दुसऱ्या खोलीत झोपलेल्या नंदा सोनवणे यांनाही दोन दिवसांनी तशीच लक्षणे दिसू लागल्याने त्यांनाही नाशिक येथे दाखल करण्यात आले.

उपचार सुरू असतानाच सोमवारी बाळू सोनवणे यांचे सकाळी पुण्यात आणि नातू हरी याचे दुपारी नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.  दरम्यान, सोनवणे कुटुंब हे ज्या खोलीत झोपले होते, तेथे उकाडा कमी करण्यासाठी कुलर लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कुलरवर शेतात वापरण्यासाठीची कीटकनाशके ठेवण्यात आली होती. तसेच डासांपासून बचाव करण्यासाठी खोलीमध्ये अगरबत्तीही लावण्यात आली होती. त्यामुळे सोनवणे परिवारातील सदस्यांची प्रकृती बिघडण्यामागे विषबाधा हे कारण असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणांनी तपासणीसाठी घरातील वस्तूंचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या सोनवणे कुटुंबातील सदस्यांच्या रक्तामध्ये विषारी अंश आढळून आल्याने त्यांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावर दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

 – डॉ. के. आर. श्रीनिवास (निवासी आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालय, नाशिक)