संमेलन काळात आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निरोगी राखण्यासाठी येथे प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे प्रवेशद्वारावर तापमापन करण्यात येणार आहे. त्यात संशयित आढळलेल्यांची जलद प्रतिजन चाचणीही केली जाणार आहे. प्रवेशद्वारावर एकदा तपासणी झाल्यानंतर निरोगी व्यक्तीच्या बोटावर हिरव्या रंगाची तर आरोग्याशी संबंधित समस्या असणाऱ्या व्यक्तीच्या हातावर लाल रंगाची निशाणी केली जाणार आहे. मतदानावेळी हाताच्या बोटावर शाईची निशाणी केली जाते. त्याच धर्तीवर प्रवेशद्वारावर खोळंबा टाळण्यासाठी हा मार्ग अनुसरण्यात आला आहे.

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो अद्याप पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. त्यामुळेच या काळात होणाऱ्या साहित्य संमेलनात आरोग्याच्या दृष्टीने विविध पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. वैद्यकीय मदत समितीचे प्रमुख डॉ. प्रशांत भुतडा यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. श्रृती पालखेडकर, डॉ. स्नेहल मगर, डॉ. विशाल जाधव, वैद्य एकनाथ कुलकर्णी आदींची बैठक पार पडली. त्यात संमेलन काळातील एकूण नियोजनावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

संमेलनात १५ ते २० हजार साहित्यप्रेमी सहभागी होण्याचा अंदाज आहे. प्रवेशद्वारावर करोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासले जाईल. संमेलन स्थळावर वैद्यकीय समितीचे तीन कक्ष कार्यान्वित असतील. प्राथमिक उपचारासाठी सहा खाटांचे रुग्णालय, सहा प्राणवायू सिलिंडर, आणि आठ ते १० रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आल्याचे डॉ. भुतडा यांनी सांगितले. शहरातील १२ रुग्णालयांनी आपली वैद्यकीय पथक देण्याचे मान्य केले आहे. प्रत्येक बुथवर चार डॉक्टर असतील. समितीतील एकूण ३६ डॉक्टर संमेलन काळात काम करणार आहेत. नामको रुग्णालय ४० आणि मातोश्री परिचारिका महाविद्यालयाकडून ३० अशा एकूण ७० परिचारिका आरोग्य कक्षासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

संमेलन स्थळी प्राथमिक उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची मदत मिळणार आहे. शहरातील १२ मोठय़ा रुग्णालयांशी समन्वय साधला गेला आहे. रुग्णाच्या व्याधीनुसार संबंधिताला त्या त्या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्याचे नियोजन आहे.

समिती सदस्यांना लस बंधनकारक

संमेलनासाठी एकूण ४० समित्या स्थापन झाल्या आहेत. या सम्त्यिांमध्ये ८०० ते ९०० सदस्यांचा समावेश आहे. संबंधितांना करोना प्रतिबंधक लस बंधनकारक करण्यात आली आहे. सदस्यांनी लस घेतली की नाही, याची पडताळणी वैद्यकीय समितीकडून करम्ण्यात येणार असल्याचे या समितीचे प्रमुख डॉ. प्रशांत भुतडा यांनी सांगितले.