जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. या चर्चांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच अखेर देवकर यांनी मौन सोडत सर्व चर्चांवर थेट स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकारांशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

जळगावात बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की, माझ्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा अपप्रचार काही जणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. आम्ही कदापिही भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातच राहून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने काम करत राहू. आमच्या भाजप प्रवेशाच्या अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जात असल्याचा आरोपही केला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय मंडळी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी त्यातून अप्रत्यक्षरीत्या सूचित केले. दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी देवकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर पत्रकारांसमोर मोठे भाष्य केले होते.

गुलाबराव पाटलांचे काय चुकले?

भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना भाजपमध्ये प्रवेश कसा दिला जाईल, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता. पालकमंत्री पाटील यांच्या वक्तव्यानंतर जिल्ह्यात विविध राजकीय चर्चांना उधाणही आले होते. त्याविषयी बोलताना माजी मंत्री देवकर म्हणाले, की गुलाबराव पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेणे अपेक्षित होते. मी किंवा अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार भाजपमध्ये अथवा इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार आहोत का, याची त्यांनी आधी खात्री करायला हवी होती. त्यानंतर माध्यमांसमोर भूमिका मांडली असती, तर ती अधिक योग्य ठरली असती.

देवकरांच्या भूमिकेनंतर कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर

दरम्यान, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी स्वतः पुढे येत भाजप प्रवेशाच्या सर्व चर्चांना स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संभाव्य पक्षांतराबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातच कायम काम करत राहणार असल्याचे जाहीर करत त्यांनी सर्व अफवा फेटाळून लावल्या. त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होण्यास मदत झाली असून, जिल्ह्याच्या राजकारणात सुरू असलेल्या चर्चांनाही विराम मिळाल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असताना देवकर यांच्या या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.