जळगाव : दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करार झाले. त्यापैकी कोका-कोलाचा प्रकल्प जामनेरमध्ये तर विमानाच्या हरित इंधनाचा प्रकल्प चाळीसगावात साकारणार आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही पुढच्या वेळी मी पण कोट घालून दावोस दौऱ्यावर जाणार असल्याचा टोला हाणला आहे.
शेतात पिकांच्या काढणीनंतर शिल्लक राहणाऱ्या टाकाऊ अवशेषांपासून विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या हरित इंधनाची निर्मिती करणारा देशातील जागतिक दर्जाचा प्रकल्प चाळीसगाव येथे उभारला जाणार आहे. राज्यात मोठी गुंतवणूक यावी, नव्या उद्योगांना चालना मिळावी आणि तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः दावोस येथे उद्योजकांशी चर्चा केली.
या दौऱ्यात चाळीसगाव तालुक्यात मोठा उद्योग यावा, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगले दर मिळावे आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, या उद्देशाने आमदार मंगेश चव्हाण हे देखील सहभागी होते. त्यांच्या पाठपुराव्यातून अमेरिकेतील सॅन फॅन्सिस्को येथील एका कंपनीशी करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार, चाळीसगाव तालुक्यात सुमारे १५ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत कोका-कोला कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मायकल गोल्टझमन यांची भेट घेऊन जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये प्रस्तावित प्रकल्पावर सविस्तर चर्चा केली. या चर्चेत प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, गुंतवणुकीचा आराखडा, रोजगार निर्मिती आणि स्थानिक विकास यासह विविध मुद्द्यांवर सकारात्मक सहमती झाली. तसेच प्रकल्पावर अधिकृतपणे शिक्कामोर्तबही करण्यात आले. कोका-कोला सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीचा प्रकल्प जामनेरमध्ये येणे ही संपूर्ण तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. तालुक्यातील अनेक तरुणांना स्थानिक पातळीवरच हक्काचा रोजगार मिळणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील ?
जामनेरसह चाळीसगावमध्ये जागतिक दर्जाचे प्रकल्प साकारणार म्हटल्यावर साहजिकच मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांची कॉलर ताठ झाली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता एका कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री महाजन आणि आमदार चव्हाण यांना टोला हाणला. जळगाव ग्रामीण मतदारसंघात मोठे प्रकल्प आणण्यासाठी मलाही कोट घालून पुढच्या वेळी दावोस दौऱ्यावर जावे लागेल, असे मिश्किल वक्तव्य त्यांनी केले.
या दरम्यान, आपल्या तरुणांकडे आता नोकरी करण्याची मानसिकता उरली नाही. बिहारी माणूस येथे येऊन आपले पोट भरतो. आपण मात्र बिहारींवर टीका करतो. कशाला टीका करता, आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची वृत्तीच उरली नाही हे सत्य आहे. तरुणांना माझ्या बोलण्याचा राग आला तर आला. आता चार वर्षांनी निवडणुका आहेत. तेव्हा पाहू, असेही मंत्री पाटील म्हणाले.
