जळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगरसह बोदवड तालुक्यात केलेल्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला आता राजकीय वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ‘एक आरोपी तुमच्यासोबत फिरताना दिसत आहे, जरा लक्ष द्या,’ असे सांगून ‘हितचिंतक म्हणून केलेल्या सूचनेने मन दुखावले तर आश्चर्य वाटते,’ अशी भूमिका ‘एक्स’वरील पोस्टद्वारे आता मांडली आहे. विशेष म्हणजे कथित आरोपी शिंदे गटाचा पदाधिकारी असल्याचा नवीन आरोप त्यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
रोहिणी खडसे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान एका आरोपीची उपस्थिती दिसून येत असल्याने पालकमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावे, एवढीच सूचना आपल्याकडून करण्यात आली होती. त्यासोबत काही प्रश्नही उपस्थित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. ‘काळजीपोटी केलेल्या या छोट्याशा सुचनेने जर तुमचे मन दुखावले असेल, तर आम्हाला आश्चर्य वाटते,’ असे म्हणत त्यांनी आपण हितचिंतक म्हणून केलेल्या सूचनेचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.
संबंधिताच्या राजकीय भूमिकेचाही उल्लेख
आपल्या पोस्टमध्ये रोहिणी खडसे यांनी संबंधित व्यक्ती कोण आहे, याबाबतही स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया विभागाचा उपसमन्वयक आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तीची पालकमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यातील उपस्थिती आणि त्यांची भूमिका याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, संबंधित व्यक्तीवर कोणता गुन्हा दाखल आहे किंवा ‘आरोपी’ म्हणून त्यांचा नेमका संदर्भ काय आहे, याबाबत अधिकृत तपशील त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालेला नाही.
‘यापुढे काळजी घ्या’, इशारा
‘संबंधित व्यक्ती कोण आहे, हे जर आपल्याला माहिती नव्हते तर राहू द्या; पण यापुढे काळजी घ्या,’ असेही रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सध्याच्या राजकारणातील परिस्थितीचा संदर्भ देत त्यांनी ‘आजचे राजकारण तर आपल्याला माहितीच आहे. लय वंगाळये’ अशीही त्यांनी टिप्पणी केली आहे. या वक्तव्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान नेमक्या कोणत्या व्यक्तींची उपस्थिती होती आणि त्याबाबत स्थानिक पातळीवर कोणते प्रश्न उपस्थित झाले, याची चर्चा सुरू झाली आहे.
तर त्याचा राजीनामा घ्या…
रोहिणी खडसे यांनी पुढे संबंधित व्यक्तीबाबत कठोर भूमिका मांडली आहे. ‘आपण खरंच गुन्हेगारांना पाठीशी घालत नसाल तर त्याचा राजीनामा घ्या,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीमुळे प्रकरणाला पक्षीय राजकारणाची किनार मिळाली असून, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याकडे पाहिले जात आहे.
दुष्काळ पाहणीपेक्षा राजकीय वाद चर्चेत
मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दौरा केला होता. या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांची स्थिती आणि दुष्काळी उपाययोजनांचा आढावा घेणे अपेक्षित होते. मात्र, कथित फरार आरोपीच्या सहभागामुळे त्यांचा दौरा वादात सापडला आहे. त्यात रोहिणी खडसे यांच्या ‘एक्स’वरील पोस्टमुळे पालकमंत्र्यांचा दुष्काळ पाहणी दौरा जिल्ह्यातील राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
