जळगाव : राज्यात मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेला वेग आला असतानाच जळगावच्या राजकीय व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका मिश्किल वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “मतदारसंघ पुनर्रचनेत आमचा पिक्चर कापता की आम्हाला ठेवता, हे तुम्हालाच माहीत. तुम्ही भाजपवाले काहीच समजू देत नाही,” असा टोला त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार नंदकुमार महाजन यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात हा राजकीय मिश्किल संवाद रंगला.

“संपूर्ण जळगाव जिल्हा आज एकसंघ आहे. जिल्ह्यातील सर्व ११ आमदार आणि दोन्ही खासदार महायुतीचे आहेत. आता मतदारसंघ पुनर्रचनेत तुम्ही काय करता, हे तुम्हालाच माहीत. आमचा पिक्चर कापता की आम्हाला ठेवता, तेही समजत नाही. तुम्ही भाजपवाले काहीच समजू देत नाही, इतके कठीण लोक आहात,” असे म्हणत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे पाहत मिश्किल टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यावर व्यासपीठावरील नेत्यांसह उपस्थित कार्यकर्त्यांनीही जोरदार दाद दिली.

मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेला वेग

देशात लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढण्याची शक्यता आणि त्यानंतर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातही राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांचे पुनर्विभाजन झाल्यास जिल्ह्यात पाच नवीन विधानसभा मतदारसंघ आणि एक अतिरिक्त लोकसभा मतदारसंघ निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये विद्यमान जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, एरंडोल–पारोळा, यावल–रावेर आणि पाचोरा–भडगाव या विधानसभा मतदारसंघांच्या सीमांमध्ये बदल होऊन नवीन मतदारसंघ अस्तित्वात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकार किंवा निवडणूक आयोगाने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

महायुतीतील राजकीय गणितांकडे लक्ष

सध्या जळगाव जिल्ह्यातील सर्व ११ आमदार आणि दोन्ही खासदार महायुतीचे असल्याने संभाव्य मतदारसंघ पुनर्रचनेनंतर राजकीय समीकरणे कशी बदलतील, याबाबत उत्सुकता वाढली आहे. नवीन मतदारसंघ निर्माण झाल्यास अनेक इच्छुकांना संधी मिळू शकते, तर काही विद्यमान मतदारसंघांच्या सीमांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने राजकीय हालचालींनाही वेग येत आहे. दरम्यान, तांदलवाडी येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार नंदकुमार महाजन यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, महायुतीचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विकासकामांसह महायुतीच्या एकजुटीवरही नेत्यांनी भाष्य केले; मात्र गुलाबराव पाटील यांच्या “आमचा पिक्चर कापता की ठेवता?” या मिश्किल टोल्याचीच सर्वाधिक चर्चा रंगली.