जळगाव : जिल्ह्यातील राजकारण, विकास कामे आणि आता गुंतवणुकीच्या क्षेत्रातही जामनेरची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर “नाही तरी सध्या जामनेर फार जोरात आहे,” असा मिश्कील टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजनांना उद्देशून जळगावातील गुंतवणूक परिषदेत लगावताच उपस्थितांमध्ये हास्याची लहर उमटली. मात्र, या मिश्कील टिप्पणीसोबतच जामनेरमधील उद्योजकांनी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात आणखी मोठी भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जळगाव जिल्ह्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी शुक्रवारी आयोजित परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तरुणांनी नोकरीच्या मानसिकतेत अडकून न राहता व्यवसाय आणि उद्योगाकडे वळण्याची गरज व्यक्त केली. याचवेळी जिल्ह्यात गुंतवणूक करणारे अनेक उद्योजक जामनेरचे असल्याचा उल्लेख करत त्यांनी जामनेरच्या सध्याच्या “जोरदार” वाटचालीकडे मिश्कीलपणे लक्ष वेधले. “जिल्ह्यात गुंतवणूक करणारेही जामनेरचे आहेत. त्यांनी आणखी गुंतवणूक वाढवावी. नाही तरी सध्या जामनेर फार जोरात आहे,” असे मंत्री पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात उपस्थितांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली. राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या चर्चेत असलेल्या जामनेरचा आता उद्योग आणि गुंतवणुकीच्या संदर्भानेही उल्लेख झाल्याने या विधानाची विशेष चर्चा रंगली.
जामनेरच्या उद्योजकांनी पुढे यावे
जामनेर परिसरातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी केवळ स्थानिक पातळीवर न थांबता जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. स्थानिक उद्योजकांकडे उद्योग उभारणीचा अनुभव आणि आर्थिक क्षमता असल्याने त्यांनी नव्या प्रकल्पांसाठी पुढाकार घेतल्यास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते, असा त्यांच्या भाषणाचा सूर होता. जळगावच्या औद्योगिक विकासासाठी बाहेरून येणाऱ्या गुंतवणुकीइतकीच स्थानिक उद्योजकांची गुंतवणूकही महत्त्वाची आहे. त्यामुळे जामनेरमधील उद्योजकांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये विस्तार करण्याची संधी साधावी, असा संदेश पालकमंत्र्यांनी दिला.
तरुणांनी नोकरीच्या मागे धावू नये
गुंतवणूक आणि उद्योगाच्या चर्चेला तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नाशी जोडताना पाटील यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील व्यवसायाची आठवण सांगितली. महाविद्यालयात असताना आपण व्हिडीओ पार्लरचा व्यवसाय केला होता. व्यवसाय फार मोठा नव्हता; मात्र त्यातून सुमारे २० जणांच्या उदरनिर्वाहाला हातभार लागत होता, असे त्यांनी सांगितले. “व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, त्यातून रोजगार निर्माण झाला पाहिजे. काम करण्याची मानसिकता असली पाहिजे. कोण म्हणतो की काम नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तरुणांनी केवळ सरकारी किंवा खासगी नोकरी मिळण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगार निर्माण करण्याचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक असलेली धडाडी आणि मेहनतीची तयारी तरुणांमध्ये असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
“मुलगा नुसता बसला तर त्याला राबवा”
पालकांनीही मुलांच्या भवितव्याकडे केवळ नोकरीच्या दृष्टीने पाहू नये, असे पाटील यांनी स्पष्ट केले. “उद्या माझा मुलगा नुसताच बसला असेल तर मी त्याला राबविलेच पाहिजे. ते प्रत्येक बापाचे कर्तव्य आहे,” असे मंत्री पाटील म्हणाले. मुलांना शिक्षणासोबत कामाचा अनुभव, व्यवसायाची ओळख आणि स्वावलंबनाची सवय लागणे आवश्यक आहे. तरुण पिढीने स्वतः रोजगार शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करण्याची मानसिकता विकसित केली तर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
“आम्ही महाराष्ट्रीयन आणि जळगावकर”
गुंतवणुकीसाठी सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे सांगताना पाटील यांनी मराठी, गुजराथी, मारवाडी अशा समाजांच्या चौकटीपलीकडे जाऊन जळगावच्या विकासाचा विचार करण्याचे आवाहन केले. “महाराष्ट्रात राहतो तो मारवाडी असो की कोणी असो, तो आपलाच आहे. आमच्या बोलण्याचा भाव ना मराठी आहे, ना गुजराथी आहे, ना मारवाडी आहे. आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, आम्ही जळगावकर आहोत,” असे त्यांनी सांगितले.
