Jalgaon Guardian Minister News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाल्याच्या घटनेनंतर पवार कुटुंबासह संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर विविध पक्षांचे नेतेही आता हेलिकॉप्टर किंवा विमानातून प्रवास करण्याची वेळ आल्यावर मागे पुढे पाहू लागले आहेत. या दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर विमानाने गेलेले जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे.

राज्यात जिल्हा परिषदांसह पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, महायुतीचे अनेक मंत्री आणि नेते वेळेअभावी विमान व हेलिकॉप्टरद्वारे हवाई प्रवास करत आहेत. मात्र, हवाई वाहतुकीसंदर्भातील तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे काही ठिकाणी अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. अशाच प्रकाराचा फटका पंकजा मुंडे यांच्यानंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही बसला असून, लातूर येथून होणारे त्यांचे परतीचे हवाई उड्डाण ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. अनेकांनी त्याबद्दल चिंताही व्यक्त केली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी मंत्री गुलाबराव पाटील हे बुधवारी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. प्रचारसभा आणि आढावा बैठका आटोपल्यानंतर ते विमानाने परतीच्या प्रवासासाठी निघणार होते. त्यांच्या नियोजित दौरा कार्यक्रमानुसार, खासगी कंपनीचे सहा आसन क्षमतेचे विमान लातूर विमानतळावरून दुपारी साडेचारच्या सुमारास उड्डाण करणार होते. मात्र, विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक असलेले हैदराबाद, बिदर आणि चेन्नई येथील हवाई यंत्रणांचे क्लिअरन्स मिळणे अपेक्षित होते. यासाठी संबंधित पायलटकडून साधारण पाच वाजेपर्यंत प्रतीक्षा करण्यात आली. तथापि, ठराविक वेळेत आवश्यक क्लिअरन्स न मिळाल्याने विमान उड्डाणाबाबत अनिश्चितता निर्माण झाली.

अखेर पायलटने तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव विमानाचे उड्डाण करण्यास असमर्थता दर्शवली. याच दरम्यान, लातूर विमानतळावर संध्याकाळच्या वेळेत नियमित उड्डाणाची सुविधा नसल्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली. परिणामी, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विमानाचे हवाई उड्डाण थेट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थात, हवाई प्रवास रद्द झाल्यानंतर मंत्री पाटील यांच्यावर तातडीची पर्यायी व्यवस्था म्हणून रस्ते मार्गे चारचाकी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आली. ते लातूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे कारने रवाना झाले. या अनपेक्षित बदलामुळे त्यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात काही प्रमाणात बदल करावा लागला. मात्र, प्रचार कार्यक्रमावर त्याचा फारसा परिणाम होऊ देण्यात आला नाही.

दरम्यान, निवडणुकांच्या धामधुमीत वाढलेल्या हवाई प्रवासामुळे क्लिअरन्स, हवामान, वेळेच्या मर्यादा आणि स्थानिक विमानतळांवरील सुविधांबाबत अडचणी समोर येत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तरीही, प्रचाराचा वेग कायम राखण्यासाठी मंत्री आणि नेते पर्यायी मार्गांचा अवलंब करत असल्याचे चित्र आहे. गुलाबराव पाटील यांनीही रस्ते मार्गे प्रवास करत पुढील नियोजित कार्यक्रमांकडे कूच केली. या प्रकाराची जळगाव जिल्ह्यातही चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वीच दिवंगत अजित पवार यांच्या श्रद्धांजली सभेत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजकारणात सक्रीय असताना इतकी धावपळ काही कामाची नाही. कुठेतरी थोडे थांबले पाहिजे, असे विधान केले होते.