जळगाव : “उद्या मी मंत्री नसलो आणि माझ्याकडे इतका खराब रस्ता असेल, तर खुटा उपटून मारेन,” अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी लातूर दौऱ्यावर असताना संताप व्यक्त केला. प्रत्यक्षात, मंत्री पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे वास्तव समोर येत आहे. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वीच तयार झालेल्या अनेक नव्या रस्त्यांचे अक्षरशः तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे.
खराब रस्त्यांच्या प्रश्नावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लातूरमधील एका प्रचारसभेत तीव्र संताप व्यक्त केला. “काँग्रेसवाल्यांचा सत्यानाश होऊ द्या. उद्या मी मंत्री नसलो आणि माझ्याकडे असा रस्ता असेल, तर खुटा उपटून मारेन,” अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
कामखेडा ते रेणापूर या रस्त्याची दयनीय अवस्था पाहून मंत्री पाटील चांगलेच आक्रमक झाले होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी मंत्री पाटील लातूर जिल्ह्यात गेले होते. प्रचारासाठी कामखेडा येथे जात असताना रेणापूर–कामखेडा रस्त्याची झालेली दुरवस्था त्यांच्या निदर्शनास आली. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण पाहून त्यांनी स्थानिक आमदारावर जोरदार टीका केली. “या भागाच्या आमदाराला आधी रस्ता दुरुस्त करायला सांगा, तोपर्यंत त्यांना गावात येऊ देऊ नका,” असा सल्ला त्यांनी उपस्थित नागरिकांना दिला.
पुढे बोलताना त्यांनी, “जर मी उद्या मंत्री राहिलो नाही आणि माझ्याकडे असा रस्ता असेल, तर मी संबंधितांना खुटा उपटून मारेन. माझ्यावर केस झाली तरी चालेल,” असे विधान करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी मंत्री पाटील यांनी स्थानिक भाजप आमदारांवरही थेट निशाणा साधला.
“सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेल्यांना या निवडणुकीतून फक्त पैसे कमवायचे असतात. म्हणून ते कुणाकडूनही तिकीट घेतात, पैसे वाटतात आणि निवडून येतात,” अशा शब्दांत त्यांनी भाजप आमदारांवर घणाघाती टीका केली. मंत्री पाटील यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, खराब रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, त्याच वेळी जळगाव जिल्ह्यातील खराब रस्त्यांकडेही आता बोट दाखवले जात आहे.
दर्जेदार रस्त्यांचा दावा फोल…
जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, रस्त्यांची कंत्राटे घेणाऱ्या कंत्राटदारांवर कोणाचेही नियंत्रण न राहिल्याने त्यापैकी काही रस्त्यांची लोकार्पण होण्याआधीच वाताहत झाल्याचे दिसून आले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील अनेक रस्त्यांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे मंत्री पाटील यांनी त्या रस्त्यांचे नुकतेच लोकार्पण केले आहे.
रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्यावर खुद्द पालकमंत्री पाटील यांनी ग्रामीण भागातील रस्ते आता खऱ्या अर्थाने दर्जेदार होतील. संबंधित कंत्राटदारांवर पुढील पाच वर्षांसाठी देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याने ग्रामसडक योजना ग्रामीण भागासाठी वरदान ठरेल, असे दावा केला होता. प्रत्यक्षात, मर्जीतील कंत्राटदारांनाच रस्त्यांची कामे देण्यासाठी शासकीय यंत्रणेवर दबाव आणला गेल्याने ग्रामसडक योजनेतून झालेल्या बऱ्याच रस्त्यांची अल्पावधीतच दुरावस्था झाली आहे. ममुराबाद ते नांद्रा खुर्द रस्ता त्यापैकीच एक आहे.
