जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पार पडलेले बहिणाबाईंच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम भवनातील अत्याधुनिक सुसज्ज सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यात विकासकामांसह राजकीय मिश्किल टोलेबाजीचीही चर्चा रंगली. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भाषणादरम्यान एकमेकांना हलक्याफुलक्या शैलीत टोले लगावत उपस्थितांची चांगलीच करमणूक केली. दोन्ही मंत्र्यांच्या टोलेबाजीमुळे संपूर्ण सभागृहात हास्याचे फवारे उडताना दिसून आले.

कार्यक्रमाची सुरुवात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणाने झाली. त्यानंतर विद्यापीठातील ए.पी.जे. अब्दुल कलाम भवनात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक, वातानुकूलित आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, संशोधन आणि विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी हे सभागृह महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

उद्घाटनानंतर सावकारेंचा मिश्किल टोला

विद्यापीठातील सभागृहाच्या उद्घाटनानंतर भाषण करताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी मिश्किल शैलीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना टोला लगावला. ते म्हणाले, “आज ज्या आधुनिक सभागृहाचे उद्घाटन झाले, त्या सभागृहाचा यापूर्वी निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत असे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवडणुकीचा निकालही याच सभागृहात लागला होता. निकालानंतर ते खूप आनंदी झाले होते. ते असेच कायम आनंदी राहोत, हीच अपेक्षा आहे. विद्यापीठ प्रशासनालाही माझी विनंती आहे की, अधूनमधून त्यांना असेच आनंदी करत राहा. त्यामुळे विद्यापीठाचेही काम अधिक चांगले होईल.” सावकारे यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला.

‘संजूभाऊ, तुम्ही रेल्वे चालवा’; पाटलांचे प्रत्युत्तर

उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या भाषणाला प्रतिसाद दिला. मंत्री सावकारे यांची टोलेबाजी संपताच पालकमंत्री गुलाबराव पाटील व्यासपीठावर आले. आणि त्यांनीही मंत्री सावकारे यांना आपल्या नेहमीच्या शैलीत प्रत्युत्तर देत वातावरणात आणखी रंगत आणली. मंत्री पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील विविध वैशिष्ट्यांचा उल्लेख करत, “कवयित्री बहिणाबाई चौधरी माझ्या मतदारसंघातील आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ माझ्या मतदारसंघात आहे. बालकवी ठोंबरे माझ्या मतदारसंघातील आहेत. जैन इरिगेशन, जैन व्हॅली, कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प तसेच विदेशाशी संबंधित अनेक उपक्रमही जळगाव ग्रामीण मतदारसंघात आहेत. त्यामुळे संजूभाऊ, तुम्ही रेल्वे चालवा… कारण तुम्ही जंक्शनला आहात”, असा सल्ला दिला. गुलाबराव पाटील यांच्या या कोटीने पुन्हा एकदा सभागृहात हास्याची लाट उसळली. दोन्ही मंत्र्यांमधील संवादाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. विकासकामांच्या औपचारिक कार्यक्रमात झालेल्या या मिश्किल संवादामुळे वातावरण हलकेफुलके झाले.

विकासकामांसह टोलेबाजीचीही चर्चा

यावेळी बोलताना मान्यवरांनी विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या वाढीव गुंतवणुकीचे कौतुक केले. अत्याधुनिक सभागृहामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक परिषद, संशोधन विषयक चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात विकास कामांइतकीच चर्चा रंगली ती मंत्री गुलाबराव पाटील आणि संजय सावकारे यांच्यातील मिश्किल राजकीय जुगलबंदीची. दोन्ही मंत्र्यांनी कोणतीही कटुता न आणता विनोदी शैलीत एकमेकांवर केलेल्या कोट्यांनी उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले आणि उद्घाटन सोहळ्याला वेगळीच रंगत आणली.