जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अडचणीत सापडलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी आता माफी मागितली आहे. त्यानंतर देखील त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही धीरेंद्र शास्त्रींचा अत्यंत कडक शब्दात समाचार घेतला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर अनेक ठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला. विविध संघटनांकडून आंदोलनांची हाक देण्यात आली. धीरेंद्र शास्त्री यांनी एका कार्यक्रमात बोलताना “छत्रपती शिवाजी महाराज थकले होते आणि त्यांनी राजपाट समर्थांकडे दिला होता” असे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे इतिहासाचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप होत असून इतिहास अभ्यासक, राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
अनेकांनी धीरेंद्र शास्त्रींचे हे वक्तव्य ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्टीकरण देत आपली भूमिका मांडली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. हिंदू राष्ट्राच्या उभारणीची प्रेरणा आम्हाला त्यांच्याकडूनच मिळाली आहे. ते गुरूप्रती किती समर्पित होते, हे सांगण्याचा माझा उद्देश होता. मात्र, काही हिंदू विरोधी शक्तींनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. तसेच, माझ्या वक्तव्यामुळे कुणी दुखावले असेल, तर मी मनापासून माफी मागतो. मी कधीही अंधश्रद्ध पसरवत नाही. माझी पूजा करा असेही कुणाला सांगत नाही. श्रद्धेने लोक आमच्या दरबारात येतात. त्यांना हनुमान भक्त करण्याचा केवळ माझा प्रयत्न असतो”, असे धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे. तरीही, त्याच्या माफीनाम्यानंतर अनेकांचे समाधान झालेले नाही. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा धीरेंद्र शास्त्री यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा समाचार पत्रकारांशी बोलताना घेतला.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
कोण बागेश्वर हा, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारा. बागेश्वर धामचा हा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपायाची खरड नाही. अक्कल नसलेले काही लोक महाराज होऊन बसले आहेत, जे काहीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात. अभ्यास असेल तर बोलावे, नाही तर बोलू नये. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काही एखादे नाणे नाही, जे इकडून घेतले आणि तिकडे फेकले. याच्यापुढे बागेश्वर असेल किंवा कोणी सागेश्वर असेल, असे छत्रपतींबद्दल वाकडे तिकडे बोलले तर त्यांना आम्ही धडा शिकवू.
