जळगाव : राज्यभर स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिले येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून सातत्याने होत असतानाच, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) नेते गुलाबराव पाटील यांनीही त्यांच्या निवासस्थानाच्या वीज बिलात मोठी वाढ झाल्याचा दावा केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. यापार्श्वभूमीवर, महावितरणनेही आता स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचा दावा खरा की महावितरणचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अर्थातच, यामुळे स्मार्ट मीटरचा वाद आणखी तापण्याची चिन्हे दिसून आली आहेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पाळधी (ता. धरणगाव) येथील निवासस्थानाचे मासिक वीज बिल पूर्वी साधारणपणे ५ ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान येत होते. मात्र, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ते सुमारे २० हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याबद्दल महावितरणच्याच एका कार्यक्रमात नुकतीच नाराजी व्यक्त केली. वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचीही मागणी केली.
मतदारसंघातील तक्रारींचाही उल्लेख
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केवळ त्यांच्या पाळधीतील निवासस्थानाचा मुद्दा उपस्थित न करता, त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील अनेक नागरिकांनीही स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात लक्षणीय वाढ झाल्याच्या तक्रारी केल्याचे सांगितले. त्यामुळे अशा सर्व तक्रारींची सखोल चौकशी करून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करावे, तसेच आवश्यक असल्यास तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.
महावितरणचे स्पष्टीकरण; एवढे बिलच नाही
दरम्यान, पालकमंत्र्यांच्या घरच्या विजबिलाच्या प्रकरणाची चर्चा वाढल्यानंतर महावितरणने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानाला ४ किलोवॅट क्षमतेची वीज जोडणी देण्यात आली असून, त्याच क्षमतेचा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पही कार्यरत आहे. या जोडणीसाठी जनरेशन मीटर आणि नेट मीटर बसविण्यात आले आहे. नेट मीटरच्या अचूक रीडिंगच्या आधारेच दरमहा वीज बिल आकारण्यात येते. महावितरणने असेही स्पष्ट केले आहे की, संबंधित वीज जोडणीच्या नोंदींची पडताळणी केली असता कोणत्याही एका महिन्याचे वीज बिल २० हजार रुपयांपेक्षा जास्त आलेले नाही. त्यामुळे स्मार्ट मीटरमुळेच वीज बिलात मोठी वाढ झाल्याचा दावा वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवर पुन्हा प्रश्नचिन्ह
राज्यात स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीबाबत विविध स्तरांवरून प्रश्न उपस्थित होत असताना, जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीच वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केल्याने या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे, महावितरणने आपल्या स्पष्टीकरणातून मीटरिंग आणि बिलिंग प्रक्रिया नियमानुसार होत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती काय, याबाबत ग्राहकांसह सर्वांचे लक्ष आता पुढील चौकशी आणि अधिकृत निष्कर्षांकडे लागले आहे.
