जळगाव : राज्यभर स्मार्ट मीटरच्या वाढीव वीज बिलांबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असतानाच, आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) नेते गुलाबराव पाटील यांनाही स्मार्ट मीटरचा फटका बसल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्या निवासस्थानाचे नेहमी ५ ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान येणारे मासिक वीज बिल स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तब्बल २० हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोरच नाराजी व्यक्त केली.

जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे सोमवारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच एमव्हीए क्षमतेच्या अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री पाटील यांनी स्वतःच्या वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात झालेली अनपेक्षित वाढ लक्षात आणून देत त्यांनी यामागील कारणांचा तपास करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

पूर्वी केले होते स्मार्ट मीटरचे समर्थन

यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, केवळ त्यांच्या निवासस्थानाचेच नव्हे, तर मतदारसंघातील अनेक ग्राहकांचेही स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी स्मार्ट मीटरविरोधात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. स्मार्ट मीटरमुळे अचूक बिलिंग होईल, दिवसा वीज वापरासाठी सवलती मिळतील आणि ग्राहकांचे वीज बिल कमी होईल, असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे नागरिकांनी निर्धास्तपणे स्मार्ट मीटर बसवावेत, असे आवाहनही त्यांनी केले होते.

स्वतःच अनुभवला वाढीव बिलाचा फटका

मात्र, आता त्यांच्या स्वतःच्याच निवासस्थानाचे नेहमीपेक्षा जवळपास चौपट वीज बिल आल्याने स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पालकमंत्र्यांनी सार्वजनिकपणे वाढीव बिलाबाबत नाराजी व्यक्त केल्याने या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. महावितरणकडून यासंदर्भात काय स्पष्टीकरण दिले जाते आणि वाढीव बिलांच्या तक्रारींवर काय उपाययोजना केल्या जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. राज्यात विविध ठिकाणी स्मार्ट मीटरच्या वाढीव वीज बिलांबाबत ग्राहकांकडून सातत्याने आक्षेप नोंदविले जात आहेत. अनेक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनीही या विषयावर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अनुभवामुळे स्मार्ट मीटरचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.