जळगाव : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत जळगावची जागा शिवसेना शिंदे गटाला आणि आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, अंतिम क्षणी ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने शिंदे गटात नाराजीची भावना निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींमध्ये पालकमंत्री पाटील यांनी प्रथमच भावनिक प्रतिक्रिया देत कार्यकर्त्यांना संयम आणि निष्ठा राखण्याचा संदेश दिला आहे.
महायुतीचे उमेदवार म्हणून भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. या वेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला महायुतीकडून शक्तिप्रदर्शनाचे स्वरूप देण्यात आले होते. मात्र, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांचे समर्थक अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. जिल्ह्यातील महायुतीत अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा यानंतर अधिकच रंगल्या. कारण, गेल्या काही दिवसांपासून जळगाव विधान परिषद मतदारसंघाची जागा कोणाला मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. शिवसेना शिंदे गटाकडून या जागेवर दावा करण्यात आला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे वारंवार पाठपुरावा केल्याचे बोलले जात होते. आपल्या मुलाला राजकीय संधी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा होती.
नसीब मे होगा तो उछलकर आयेगा…
महायुतीतील अंतिम चर्चेनंतर भाजपला जळगावची जागा देण्याचा निर्णय झाला आणि भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी प्रथमच सार्वजनिकरीत्या आपली भूमिका मांडली. भाषणादरम्यान ते काहीसे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. मुलाला उमेदवारी न मिळाल्याबाबत विरोधकांकडून सुरू असलेल्या टीका आणि टोमण्यांनाही त्यांनी थेट उत्तर दिले. अनेक जण सध्या टोमणे मारत आहेत की, तुमच्या मुलाला विधान परिषदेसाठी तिकीट मिळालं नाही. पण मी त्यांना एवढंच सांगतो, ‘नसीब मे होगा तो उछलकर आयेगा… और नसीब में नही होगा तो आकर चला जायेगा.’ देवाच्या मनात यापेक्षाही पुढे आयुष्यात काहीतरी चांगलं देण्याचं असेल. त्यामुळे प्रारब्धावर विश्वास ठेवला पाहिजे,” असे ते म्हणाले.
कार्यकर्त्यांना निराश न होण्याचा सल्ला
त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात काही काळ शांतता पसरली होती. कार्यकर्त्यांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले होते. स्वतःच्या मनातील खंत लपवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी कार्यकर्त्यांना निराश न होण्याचा सल्ला दिला. राजकारणात संघर्ष, संयम आणि निष्ठा यांचे महत्त्व सांगताना त्यांनी पक्षाशी बांधिलकी कायम ठेवण्याचे आवाहन केले. “आयुष्यात सगळं करा, राजकारण जरूर करा; पण भगव्या विचारांचा प्रकाश कधीही सोडू नका,” असे सांगत त्यांनी शिवसेनेच्या विचारसरणीशी प्रामाणिक राहण्याचा संदेश दिला. सत्तेची पदे येतात आणि जातात, मात्र विचारांशी असलेली निष्ठा कायम राहिली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या राजकीय आयुष्यात कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित करताना तुम्ही गुलाबराव पाटलाला आमदार केलं, मंत्री केलं, म्हणूनच आज मी सामाजिक कार्य करू शकतो आणि तुमची सेवा करू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
भाजपच्या गोटात अस्वस्थता
दरम्यान, भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीनंतर महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे नेते सांगत असले, तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचे आव्हान महायुतीसमोर उभे राहिले आहे. शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांची भूमिका, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पुढील रणनीती आणि निवडणुकीत होणाऱ्या घडामोडी याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या दरम्यान, मंत्री पाटील यांची मनधरणी करुन शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यासाठी भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी पालकमंत्री पाटील यांची त्याच्या निवासस्थानी भेटही घेतली आहे.
