जळगाव : जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीदरम्यान उमेदवारी आणि बंडखोरीच्या मुद्द्यावरून भाजप व शिवसेना (शिंदे) गटात निर्माण झालेला तणाव निवळत नाही तोच आता दोन्ही पक्षांतील राजकीय शीतयुद्ध पुन्हा चर्चेत आले आहे. पाचोरा आणि चाळीसगावमधील वादानंतर जळगाव ग्रामीण मतदारसंघातही राजकीय हालचालींना वेग आला असून, अजित पवार गटातील एका प्रमुख नेत्याच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींमुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडींकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
विधान परिषद निवडणुकीत उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेना (शिंदे) गटात मतभेद उफाळून आले होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात शिंदे गटाने सामंजस्याची भूमिका घेतल्याने वाद निवळला आणि भाजपचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. त्यानंतर दोन्ही पक्षांतील संबंध सुरळीत होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच पुन्हा स्थानिक पातळीवर संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.
पाचोऱ्यातील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यात अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद अद्याप कायम आहे. त्यातच आता जळगाव ग्रामीणमध्ये अजित पवार गटातील एका प्रभावी स्थानिक नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घडामोडींचा थेट परिणाम पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या राजकीय बालेकिल्ल्यावर होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
दरम्यान, जळगाव ग्रामीणमधील राजकीय हालचालींची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त करत भाजपला सूचक इशारा दिला आहे. भाजपमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र, ज्यांनी आतापर्यंत भाजप-शिवसेना युतीच्या विरोधात निवडणुका लढवल्या, अशा व्यक्तींना प्रवेश देण्यामागे काय उद्देश आहे, हा प्रश्न उपस्थित होतो, असे त्यांनी म्हटले आहे. जर अशा प्रकारे पक्षांतरांना प्रोत्साहन दिले जाणार असेल, तर आमच्याकडेही प्रवेशासाठी इच्छुकांची मोठी यादी आहे. कोणी कोणाला शह देत नाही. प्रत्येकाने आपल्या मतदारसंघात जनाधार मजबूत ठेवला पाहिजे. आम्ही हंगामी राजकारण करणारे नाही, तर सातत्याने जनतेत राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
पक्षांतर करणाऱ्यांवर टीका करताना मंत्री पाटील म्हणाले, की जे स्वतःच्या पक्षात टिकू शकत नाहीत किंवा जनाधार गमावतात, तेच दुसऱ्या पक्षात प्रवेश करून स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करतात. काही जण स्वतःवरील आरोप किंवा गैरव्यवहार झाकण्यासाठीही पक्ष बदलतात. प्रत्येक पक्षाला विस्ताराचा अधिकार आहे; मात्र त्यासाठी काही राजकीय पथ्ये पाळली पाहिजेत. भाजपनेही ती पाळावीत. अन्यथा आमच्याकडेही पर्याय खुले आहेत.
भाजपची भूमिका अद्याप गुलदस्त्यात
दुसरीकडे, भाजपकडून जळगाव ग्रामीणमधील अजित पवार गटातील संबंधित नेत्याच्या प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, राजकीय स्तरावर सुरू असलेल्या हालचालींमुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पुढील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामीणमधील या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संबंधित नेत्याचा भाजप प्रवेश प्रत्यक्षात होतो का, तसेच त्यानंतर शिवसेना शिंदे गटाची भूमिका काय राहते, याकडे आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
