नाशिक – स्थानिक सुक्ष्म, लघू उद्योग (एमएसएमई) आणि उद्योजकांना एचएएलच्या विमान निर्मिती प्रकल्पांशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील सुटे भाग उत्पादक व पुरवठादारांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होईल. त्यातून आत्मनिर्भर भारत अभियानाला बळ मिळेल तसेच नाशिकच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), नाशिक विभागाचे महाव्यवस्थापक संजय चौधरी यांनी केले. यावेळी त्यांनी एचएएलचा भविष्यात २०० आसनी प्रवासी विमानाची निर्मिती करण्याचा मानस असल्याचे नमूद केले.

नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि एचएएल, नाशिक विभाग यांच्यावतीने संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी दोन दिवसीय एचएएल – पुरवठादार बैठकीचे आयोजन निमा हाऊस येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी चौधरी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी निमाचे अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनिष रावल व किशोर राठी आदी उपस्थित होते. संरक्षण उत्पादनातील स्वदेशीकरणाला गती देणे आणि स्थानिक पुरवठा साखळी अधिक सक्षम करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून स्थानिक उत्पादक, लघुउद्योग आणि नवउद्यमींना एचएएलच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून व्यावसायिक संधी, तांत्रिक अपेक्षा आणि निविदांविषयी माहिती मिळण्याची संधी उपलब्ध होत आहे.

नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान स्थानिक उद्योगांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असा विश्वासही चौधरी यांनी व्यक्त केला. तेजससह विविध लढाऊ विमानांच्या निर्मितीत एचएएल आणि विशेषतः नाशिक विभागाच्या कामगिरीची त्यांनी माहिती दिली. भविष्यात २०० आसनी प्रवासी विमानाची निर्मिती करण्याचा एचएएलचा मानस असल्याचे त्यांनी जाहीर करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

नाशिकमधील उद्योगांनी एचएएलशी भागीदारी करून ‘विकसित नाशिक’ या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी केले. यावेळी एचएएलतर्फे आउटसोर्सिंग, लढाऊ विमानांच्या सुट्ट्या भागांचे झालेले स्वदेशीकरण, पुरवठा साखळी, जेम पोर्टल व ट्रेड्सची चित्रफितीत माहिती देण्यात आली. उत्पादित करावयाच्या सुट्ट्या भागांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे.

पुरवठादारात नाशिकचा टक्का कमी

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत एचएएलबरोबर महाराष्ट्रासह विविध राज्यांतील एकूण ४११ पुरवठादार (व्हेडर्स) सहभागी झाले आहेत. त्यापैकी नाशिकमधील १२६ पुरवठादारांनी नोंदणी केली असली तरी केवळ २६ पुरवठादार प्रत्यक्ष पुरवठा करत असल्याबद्दल एचएएल नाशिक विभागाचे महाव्यवस्थापक संजय चौधरी यांनी खंत व्यक्त केली.