नाशिक : इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि नाशिक तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून ढगफुटीचा धोका टळला असला, तरी यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये नवा राजकीय वाद रंगला आहे. अयोध्या येथील राम मंदिरातील कथित अपहाराच्या निषेधार्थ काँग्रेसने राज्यभर ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाचे आयोजन केले आहे. या आंदोलनाची सुरुवात मंगळवारी नाशिकच्या काळाराम मंदिरातून करण्यात आली. हे आंदोलन दडपण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये ढगफुटी होणार असल्याची खोटी अफवा पसरवल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. त्याला राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी, अशा लोकांमुळे काँग्रेस रसातळाला गेली आहे, असे प्रत्युत्तर दिले.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीची शक्यता असून काही भागांत ३०० मिलिमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो, अशी माहिती आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी करत शाळा, महाविद्यालये आणि आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सर्व यंत्रणांनी सज्ज राहून खबरदारीच्या उपाययोजना केल्या. दरम्यान, घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस सुरूच होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाला नाशिकच्या काळाराम मंदिरातून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. यावेळी खासदार शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शरद अहिर, नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष निलेश ऊर्फ बबलू खैरे आदी उपस्थित होते.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. काँग्रेसचे आंदोलन मोठ्या प्रमाणावर होऊ नये आणि लोकांचे लक्ष विचलित व्हावे, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमध्ये ढगफुटी होणार असल्याची खोटी अफवा पसरवली. संपूर्ण राज्यात पाऊस सुरू असल्यामुळे आम्ही आंदोलनाला माफक स्वरूप दिले. मात्र, हे आंदोलन होऊ नये आणि नागरिकांनी त्यात सहभागी होऊ नये, यासाठी हवामान विभागाने कोणताही इशारा दिलेला नसतानाही ढगफुटीची अफवा पसरवण्यात आली. भाजपचे बिंग फुटू नये म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोटे वक्तव्य केले, असा आरोप त्यांनी केला.
‘अशा लोकांमुळे काँग्रेस रसातळाला…’
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आरोपांना मंत्री गिरीश महाजन यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले. होय, आम्हीच पाणी वर पाठवले आणि ढगफुटी घडवून आणली, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. सपकाळ यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. राज्यातील जनता गंभीर संकटाचा सामना करत आहे. अनेक भागांत अल्पावधीत विक्रमी पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत आपण काय बोलतो आणि काय बोलले पाहिजे, याचे भान त्यांना राहिलेले दिसत नाही. संपूर्ण प्रशासन आणि यंत्रणा मदतकार्यात व्यस्त असताना काँग्रेसचे नेते अशी विधाने करत आहेत. अशा लोकांमुळेच काँग्रेस रसातळाला गेली आहे, असे महाजन म्हणाले.
