नाशिक – वादग्रस्त विधानांसाठी सदैव चर्चेत राहणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जागतिक आदिवासी गौरवदिनानिमित्त नाशिक येथे आयोजित आदिवासी मेळाव्यात जंतर मंतरवर जेन झीने दिलेल्या लढ्याचे कौतुक करतानाच केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रखर टीका केली.आदिवासींनी आपली संस्कृती आणि ओळख कायम ठेवण्यासाठी प्रामुख्याने अशा मनुवादी घटकांपासून सावध राहण्याचा इशाराही सपकाळ यांनी दिला.
जागतिक आदिवासी गौरवदिनानिमित्त नाशिक येथे आदिवासी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या भाषणास उपस्थितींचा प्रतिसाद मिळाला. सपकाळ यांनी, आदिवासी संस्कृतीचे गुणगान गायिले. आदिवासींना आपली संस्कृती टिकविण्यासाठी आता संघर्ष करण्याची वेळ आली आहे. जंतर मंतरवर जेन झीने जसा व्यवस्थेविरुध्द लढा दिला, तसा लढा आदिवासींना द्यावा लागेल. ध्रुवीकरणाची चाल खेळली जात आहे. त्यास आदिवासी समाजाने बळी पडता कामा नये, असे त्यांनी सूचित केले.
संविधानाच्या मुळावर मनुवादी विचार येत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिवासी संस्कृती संपविण्याचे काम करत आहे. त्यांच्याकडून आदिवासींचा उल्लेख वनवासी असा केला जातो. त्यांना या माध्यमातून आदिवासींची मूळ ओळख आणि आदिवासी संस्कृती नष्ट करायची आहे. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा आदिवासी संस्कृती श्रेष्ठ आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी नमूद केले. आदिवासींकडून जल, जंगल, जमीन हे काढून घेतले जात आहे. आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना विकत घेता येत नाही, असा कायदा आहे. परंतु, आता महसूल मंंत्र्यांनी ९९ वर्षांच्या कराराने आदिवासींची जमीन विकत घेण्यासंदर्भात नियम केला आहे. याविरुध्द लढणे गरजेचे आहे.
रडत बसण्यापेक्षा आता संविधान हातात घेत लढावे लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी तयार राहण्याची आवश्यकता आहे. संविधानासाठी लढाई लढावी लागणार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढाई सुरु केली आहे. निवडणुका येतील आणि जातील. परंतु, राहुल गांधी यांच्यामागे उभे न राहिल्यास अडानी आणि अंबानी यांचे हात मजबूत होतील. सध्या फक्त दोनच जाती शिल्लक आहेत. एक शोषण करणारी आणि दुसरी शोषित. वारेमाप भ्रष्टाचारातून सत्तेत शक्ती बसली आहे. समाज बिघडविण्याचे काम करणाऱ्या शक्तींचा निषेध करतो, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
पंचमहाभूतांना देव मानणे ही आदिवासींची संस्कृती आहे. आदिवासी संस्कृती राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे, असा सपकाळ यांनी नमूद केले. आपल्या संपूर्ण भाषणात सपकाळ यांनी केंद्र सरकारला अधिक लक्ष्य केले.
