नंदुरबार : राज्यातील शेतकऱ्यांबाबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी असून, त्यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. तसेच त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी नंदुरबार तालुक्यातील नांदरखेडा आणि पिंपरी शिवारात प्रत्यक्ष शेतात जाऊन दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दुष्काळाच्या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास देत त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता अधोरेखित केली. नंदुरबार जिल्ह्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या समितीने पाहणी केल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. शासन त्यांच्या पाठीशी असून, त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली. सध्या पीक कापणीचे प्रयोग सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर नुकसानभरपाईचे निकष निश्चित करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मंत्री मुश्रीफ जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी परिस्थितीचा आढावाही घेणार असून, त्यानंतर अक्कलकुवा तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक होणार आहेत.या दौऱ्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने भविष्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांशी संबंधित व्यापार, व्यवसायावरही झाला आहे. शहरातील दुकानांमधील गर्दीही त्यामुळे कमी झाली आहे.
