नंदुरबार – गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत नावेदला जनरल प्रवर्गातून उभे न करण्याची चुक झाली. आमचं भाजपशी अनेक दिवसांपासूनचे भांडण मिटले नाही. भांडण निवडणूकपर्य़त न मिटल्याने एकजूट राहिली नाही. त्यामुळेच विरोधात निकाल गेला, असे गोकुळच्या निवडणूक निकालाचे विश्लेषण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बंटी पाटील यांनी लोकांचा जनाधार मिळवला असेल तर अध्यक्ष बनविण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यामुळे आम्ही काही सहकार्य करणार नाही, अशी भुमिकाही मुश्रीफ यांनी मांडली.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मुलगा नावेदचा पराभव होणे, याची सल नंदुरबारचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबारमध्ये व्यक्त केली. गोकुळसाठी अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया गुरुवारी होणार होती. परंतु, अध्यक्ष पदासाठी असलेला १४ संचालकांचा कोरम बंटी पाटील गटाकडे नसल्याने सभा तहकुब झाली. याबाबत मंत्री मुश्रीफ यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी मुलगा नावेद या निवडणुकीत पराभूत झाल्याचे आपणास दु:ख असल्याचे सांगितले. गोकुळच्या निवडणूकीत नावेदला जनरल प्रवर्गातून उभे न करण्याची माझी चुक झाली. कॉग्रेस धर्मनिरपेक्षतेचा आव आणते. आणि त्यांनी नावेदविरोधात जातीयवादी प्रचार केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला.

आमचे आणि भाजपचे अनेक दिवसांपासून भांडण मिटले नाही. भांडण निवडणूकपर्य़त न मिटल्याने एकजूट राहिली नाही. त्यामुळेच विरोधात निकाल गेला, असे मुश्रीफांनी सांगितले. गोकुळमध्ये आता आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे बंटी पाटलांना मदत कशी करायची, असा प्रश्न उपस्थित केला. गेल्या वेळेला शशिकांत पाटील जुवेकर यांना चेअरमन करणार होतो. मात्र युतीचा चेअरमन करावा, असा दबाव असल्याने नावेदला चेअरमन केल्याचे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. मात्र भविष्यात शशिकांत पाटील जुवेकर यांना चेअरमन करण्याची जबाबदारी आम्हालाच पार पाडावी लागेल, असे सुचक वक्तव्य देखील हसन मुश्रीफ यांनी केले.

विधान परिषदेसाठी झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणूक निकाल बघता महायुतीच्या तिन्ही पक्षांनी सावध होण्याची गरज मुश्रीफ यांनी व्यक्त केली. या निवडणुकीवर जेन-झीचा प्रभाव आहेच. मात्र आपआपसात भांडत बसलो, तर त्याचे काय परिणाम होतात, हे निकालातून दिसुन आले. पुण्यात आम्ही स्मिता जाधव यांना तिकीट दिले होते . त्या नऊ हजार मतांनी पडल्या. शिक्षक मतदार संघातील सानप नावाच्या उमेदवाराला शिंदे साहेबांनी पाठिंबा दिला. त्यांनी देखील पदवीधरची मते खाल्लीच असतील. हे वाद जर मिटवू शकलो असतो तर महायुतीचे आमदार अधिक झाले असते. संभाजीनगरला चव्हाणांची तिसरी टर्म होती. त्यांच्या विरोधात अँन्टी इन्कंबसी होती. मात्र याठिकाणी अब्दुल सत्तारांनी विरोधी उमेदवाराचा खुलेआम प्रचार केला. मग युतीला अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित करत मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांनी तिन्ही पक्षांना बसवून मार्ग काढून असे धोके टाळले पाहिजेत, असे म्हटले आहे.