जळगाव : जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणातील पाणीसाठ्यात जोरदार पावसामुळे सातत्याने वाढ होत असून, सुरक्षित नियमन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या जलसंपदा विभागाच्या नोंदीनुसार हतनूरची पाणीपातळी २११.९५० मीटर इतकी झाल्याने ३६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. दुसरीकडे, गिरणा धरणातही ९५.९१ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. गिरणाचा साठा झपाट्याने वाढत असून तो आता पूर्ण क्षमतेच्या जवळ पोहोचत आहे.

सध्या हतनूर धरणात २७८.५० दशलक्ष घनमीटर इतका एकूण पाणीसाठा उपलब्ध असून तो धरणाच्या एकूण साठवण क्षमतेच्या ७१.७८ टक्के आहे. यापैकी १४५.५० दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा असून तो उपयुक्त साठ्याच्या ५७.०६ टक्के इतका आहे. धरण परिसरात गेल्या २४ तासांत ५ मिमी पावसाची नोंद झाली असून चालू मान्सून हंगामातील एकूण पर्जन्यमान १७२ मिमी इतके झाले आहे. पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक कायम आहे. पुढील काही दिवसांत साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

७५ हजार क्युसेकहून अधिक विसर्ग

हतनूर धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सध्या ३६ वक्राकार दरवाजे प्रत्येकी १.०० मीटरपर्यंत उघडे ठेवण्यात आले आहेत. ज्यामधून २२३२ क्युमेक्स म्हणजेच सुमारे ७८,८२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. याशिवाय सिंचनासाठी कालव्याद्वारे ५.६६ क्युमेक्स (२०० क्युसेक) पाणी सोडण्यात येत आहे. आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. वरच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार धरणातील विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येऊ शकते, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हतनूर धरणातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे तापी नदीच्या प्रवाहात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागातील ग्रामस्थांनी विशेष सतर्कता बाळगावी, नदी पात्रात जाणे, मासेमारी करणे, पाणी ओलांडण्याचा प्रयत्न करणे तसेच पूरप्रवण भागात विनाकारण वावर टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गिरणा धरणातून अतिरिक्त पाणी केव्हाही नदीपात्रात सोडले जाण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने गिरणा काठावरील गावांतील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.