जळगाव : उगमस्थळी तसेच पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तापीवरील हतनूर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा या धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पाण्याची वाढती आवक लक्षात घेता या धरणाची पाहणी करुन संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

हतनूर धरणाची दुपारी १२ वाजेपर्यंत जलपातळी २११.७५० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, पूर्ण जलाशय पातळी २१४.००० मीटर इतकी आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २६८.५० दशलक्ष घनमीटर (६९.२० टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा १३५.५० दशलक्ष घनमीटर (५३.१४ टक्के) इतका आहे. सर्व ४१ दरवाजे पूर्णपणे उघडल्याने हतनूरमधून ८,९२६ क्युमेक्स म्हणजेच ३,१५,२२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कालव्यातून ५.६६ क्युमेक्स (२०० क्युसेक) पाणी सोडण्यात येत आहे. आर.एस. दरवाजातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. धरण परिसरात शुक्रवारी ८६ मिमी पावसाची नोंद झाली असून, चालू हंगामातील एकूण पर्जन्यमान २५८ मिमी इतके झाले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी घुगे यांनी हतनूर धरणातील पाणीपातळी, जलसाठा तसेच धरणावरील विविध तांत्रिक बाबींची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून धरणाची सद्यःस्थिती, पाण्याची आवक-जावक, विसर्गाचे नियोजन, धरणाच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाची तयारी याबाबत सविस्तर माहिती घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन महसूल, जलसंपदा, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य व स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व संबंधित यंत्रणांनी पूर्णतः सज्ज राहून परस्पर समन्वयाने काम करावे, असेही निर्देश दिले. धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत वेळोवेळी नागरिकांना माहिती देणे, नदीकाठच्या गावांशी सातत्याने संपर्क ठेवणे, आवश्यक असल्यास तत्काळ स्थलांतराची तयारी ठेवणे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

धरण परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करताना त्यांनी नियंत्रण कक्ष, जलपातळी नोंद प्रणाली आणि धरण संचालनाशी संबंधित विविध बाबींचाही आढावा घेतला. धरणातील पाण्याची आवक कायम असल्याने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार विसर्गात बदल करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. प्रशासनाने तापी नदीकाठच्या नागरिकांना विनाकारण नदीपात्रात किंवा पुलांवर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच मच्छीमार, शेतकरी आणि नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून जिल्हा प्रशासन, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.