जळगाव : जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर मुख्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात येत असून, शनिवारी सकाळी १० वाजेच्या अधिकृत आकडेवारीनुसार यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा एकाच वेळी मोठ्या संख्येने वक्राकार दरवाजे उघडण्यात आल्याने नदी पात्रात ४९ हजारांहून अधिक क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

सद्यस्थितीत तापी नदीवरील हतनूर धरणात एकूण २८९ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ७४.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी उपयुक्त जलसाठा १५६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६१.१८ टक्के इतका आहे. पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाढ होत असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

२२ वक्राकार दरवाजातून विसर्ग

हतनूर धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाने २२ वक्राकार दरवाजे प्रत्येकी एक मीटर उंचीपर्यंत उघडले आहेत. त्याद्वारे तापी नदीपात्रात १४०४ क्युमेक्स म्हणजेच ४९ हजार ५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय सिंचन कालव्यामधून ८.५० क्युमेक्स (सुमारे ३०० क्युसेक) पाणी सोडण्यात येत आहे. आर.एस. गेटमधून मात्र कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. पाण्याची आवक आणि धरणातील जलपातळी लक्षात घेऊन विसर्गाचे नियोजन करण्यात येत असल्याचे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता

गेल्या २४ तासांत हतनूर धरण परिसरात २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, चालू हंगामातील एकूण पर्जन्यमान ७६ मिलीमीटरवर पोहचले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविल्याने हतनूर धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार आवश्यकतेनुसार धरणातील विसर्गात वाढ अथवा घट करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. धरणातील जलपातळी आणि पाण्याची आवक यावर जलसंपदा विभागाकडून चोवीस तास देखरेख ठेवण्यात येत आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात मासेमारी, पोहणे, जनावरे चारण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी उतरणे टाळावे, तसेच सखल भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनालाही सजग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. धरणातील जलसाठ्यात होत असलेली वाढ ही खरीप हंगामासाठी दिलासादायक असली, तरी संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाकडून सर्व बाबींवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.