जळगाव : जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर मुख्य प्रकल्प यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच चर्चेत आला असून, धरणाचे चार रेडियल दरवाजे गुरुवारी सकाळी उघडण्यात आले आहेत. धरणातील पाणीसाठ्यात होत असलेली वाढ लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने हा निर्णय घेतला. सध्या हतनूरमधून १५२ क्युमेक्स म्हणजेच ५३६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे तापी नदीच्या प्रवाहात वाढ होणार असल्याने नदीकाठावरील गावांतील पाणी योजनांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पाणलोट क्षेत्रातील समाधानकारक पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. धरण सुरक्षित पातळीवर ठेवण्यासाठी आणि जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने चार दिवसांपूर्वी दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी सहा वाजता चार रेडियल दरवाजे प्रत्येकी ०.५० मीटरने उघडण्यात आले आहेत. या दरवाज्यांमधून एकूण १५२ क्युमेक्स वेगाने पाणी तापी नदीत सोडण्यात येत आहे. याशिवाय सिंचन कालव्यामधून ८.५० क्युमेक्स म्हणजे ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. गुरुवारी (दि.२) सकाळी ६ वाजता घेण्यात आलेल्या नोंदीनुसार धरणाची जलपातळी २११.९७० मीटर इतकी नोंदविण्यात आली. धरणाची पूर्ण जलाशय पातळी २१४.००० मीटर असून, सध्या धरणात २७९.५० दशलक्ष घनमीटर म्हणजे ७२.०४ टक्के इतका एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा १४६.५० दशलक्ष घनमीटर (५७.४५ टक्के) आहे. त्यामुळे अद्याप धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठविण्याची क्षमता उपलब्ध असली, तरी वरच्या भागातून येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गाचे नियोजन सुरू ठेवण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी विसर्ग लाभदायी

गुरुवारी सकाळी धरण परिसरात पावसाची नोंद झालेली नसून, गेल्या २४ तासांत शून्य मिलिमीटर पाऊस झाला आहे. मात्र, चालू हंगामात आतापर्यंत एकूण ३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता व्यक्त केल्यामुळे धरणात होणाऱ्या आवकेवर पाटबंधारे विभागाचे सातत्याने लक्ष आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यास हतनूर धरणातील विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ अथवा घट केली जाऊ शकते. धरणातून तापी नदीत विसर्ग सुरू झाल्यानंतर नदीच्या प्रवाहात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांतील पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळण्याबरोबरच नदीलगतच्या विहिरी, कूपनलिका आणि इतर जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठीही हा विसर्ग लाभदायी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन

दरम्यान, हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने तापी नदीच्या दोन्ही काठावरील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदीपात्रात विनाकारण जाणे, पाण्यात उतरून मासेमारी करणे, जनावरे धुणे किंवा नदीकाठावर गर्दी करणे टाळावे, तसेच लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ होऊ शकते, त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क राहून स्थानिक प्रशासन व जलसंपदा विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने तापी खोऱ्यातील नागरिकांचे लक्ष या घडामोडीकडे लागले असून आगामी काळातील पावसाच्या तीव्रतेनुसार धरणातील जलसाठा आणि विसर्गाचे चित्र बदलण्याची शक्यता आहे.