जळगाव : धावत्या रेल्वेत दिवा लावून धार्मिक विधी करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. उघड्या ज्योतीमुळे डब्याला आग लागण्याची तसेच प्रवाशांच्या जीविताला आणि रेल्वेच्या मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. हजरत निजामुद्दीन–म्हैसूर एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला. संबंधित प्रवाशाला भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरवून रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १२७८२ हजरत निजामुद्दीन–म्हैसूर एक्स्प्रेसच्या ए–१ कोचमधील बर्थ क्रमांक १७ वर एक प्रवासी दिवा लावून पूजा करीत असल्याची माहिती भुसावळ येथील कमर्शियल कंट्रोल रूमला मिळाली. खंडवा येथे कर्तव्यावर असलेले तिकीट तपासणी अधिकारी रमण कुमार शर्मा यांनी ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आवश्यक कारवाईसाठी संबंधित प्रवाशाला भुसावळ स्थानकावर गाडीमधून उतरविण्यात आले. चौकशीदरम्यान त्याची ओळख मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील ५५ वर्षीय गरीबा अशी झाली. त्याने सायंकाळची प्रार्थना करताना आपल्या आरक्षित बर्थवर दिवा लावल्याचे सांगितले.

सूचना दिली तरीही दिवा विझवला नाही

प्रवाशाने दिवा लावल्याचे लक्षात आल्यानंतर कर्तव्यावरील टीटीईने त्याला तत्काळ दिवा विझविण्याची सूचना केली. धावत्या रेल्वेत उघडी ज्योत ठेवणे धोकादायक असून, त्यातून आग लागल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच रेल्वेच्या मालमत्तेलाही मोठे नुकसान होऊ शकते, असे त्याला समजावून सांगण्यात आले. मात्र, प्रार्थना पूर्ण झाल्यानंतरच दिवा विझवणार असल्याचे प्रवाशाने सांगितले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ टीटीईने आपल्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केला. घटनास्थळावरून एक आगपेटी, एक पितळी दिवा आणि एक स्टीलचा कंटेनर जप्त करण्यात आला. रेल्वे प्रशासनाने या घटनेकडे केवळ धार्मिक विधी म्हणून न पाहता सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक कृती म्हणून पाहत कायदेशीर कारवाई केली.

रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल

प्रवाशांच्या आणि रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेला संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या या कृत्याबद्दल संबंधित प्रवाशाविरुद्ध रेल्वे कायदा, १९८९ मधील कलम १५३ आणि १४५ (ब) अंतर्गत मंगळवारी कारवाई करण्यात आली. आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर संबंधित प्रवाशाला भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील कलम ३५ (सी) अंतर्गत नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.

रेल्वे प्रवासादरम्यान कोणतेही ज्वलनशील पदार्थ नेऊ नयेत तसेच दिवे, मेणबत्त्या, अगरबत्ती किंवा अन्य उघड्या ज्योतींचा वापर करू नये, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धावत्या गाडीमध्ये आगीची छोटीशी ठिणगीही मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते. त्यामुळे स्वतःच्या श्रद्धा किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी डब्यात उघड्या ज्योतीचा वापर न करता सुरक्षित पर्यायांचा अवलंब करावा.

कलम १४५ (ब) अंतर्गत कारवाई झाल्यास रेल्वे परिसरातून हकालपट्टी, पास किंवा तिकीट जप्त करणे, १ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. चेतावणी देऊनही गुन्हा सुरू राहिल्यास सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५ हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर रेल्वे कायद्याच्या कलम १५३ अंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यासाठी पाच वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.