नाशिक : जिल्ह्यात शनिवारी रात्री येवला आणि नांदगाव तालुक्यास वादळी पावसाने झोडपले. नगरसूल येथे शेतकऱ्याच्या घराचे पत्रे उडून १२ वर्षाची मुलगी जखमी झाली. मनमाड येथे पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला.
दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर शनिवारी सायंकाळी मनमाड शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. पाऊण तास पावसाचा तडाखा सुरू होता. येवला तालुक्यातील नगरसूल येथे रात्री आठ वाजता शेतकरी शरद पवार यांच्या घराचे पत्रे उडाले. त्यात १२ वर्षाची लहान मुलगी जखमी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. पाऊस सुरू होताच मनमाड शहरात वीजपुरवठा खंडित झाला, पावसामुळे अनेक व्यावसायिकांचे साहित्य भिजले.
मे महिन्यात पावसाने जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मध्यंतरी काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांनाही वेग आला. शेतकरी खरीप पूर्वतयारीच्या कामात व्यस्त आहेत. त्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.