scorecardresearch

अतिवृष्टीने चाळीसगावातील पूल पाण्याखाली तर, वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू

परतीच्या पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली. तितूर व डोंगरी या नद्यांना पूर आला आहे.

अतिवृष्टीने चाळीसगावातील पूल पाण्याखाली तर, वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू
अतिवृष्टीने चाळीसगावातील पूल पाण्याखाली तर, वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू

जळगाव : शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत गुरुवारी सायंकाळी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. अतिवृष्टीने चाळीसगाव तालुक्यातील तितूर व डोंगरी या नद्यांना पूर आला असून, यामुळे चाळीसगाव शहरातील पुलावरून पाणी वाहत आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे वीज कोसळून ३५ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला तर कुटुंबातील चौघे जखमी झाले.परतीच्या पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली. तितूर व डोंगरी या नद्यांना पूर आला आहे. चाळीसगाव शहरातील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले आहे. या स्थितीत जीव धोक्यात घालून नागरिकांचा पुलावरून प्रवास सुरू असल्याचे दिसून आले. या नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अमळनेर तालुक्यातील मांडळ शिवारात वीज कोसळून आनंदा सुरेश कोळी (३५) या शेतमजुराचा मृत्यू झाला. मांडळ शिवारातील भगवान पारधी यांच्या शेतात भुईमूग काढणीसाठी कोळी कुटुंब गेले होते. त्यावेळी पावसाला सुरुवात झाल्याने त्यांनी झाडाखाली आश्रय घेतला. तेव्हाच वीज कोसळली. या दुर्घटनेत कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या सासू लटकनबाई कोळी (६०), पत्नी प्रतिभा कोळी (३०), मुलगा राज (नऊ), प्रशांत (सात) हे जखमी झाले. या घटनेची माहिती समजल्यानंतर शेतकऱ्यांनी धाव घेतली. जखमींना अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मारवड येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या