नाशिक: व्यापारी संकुलांचे वाहनतळ गडप, वर्दळीच्या काळात अवजड वाहने रस्त्यांवर | Heavy vehicles on roads during rush hours in nashik untwadi amy 95 | Loksatta

नाशिक: व्यापारी संकुलांचे वाहनतळ गडप, वर्दळीच्या काळात अवजड वाहने रस्त्यांवर

नाशिकमधील अपघातांना मनपा, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष कारणीभूत

नाशिक: व्यापारी संकुलांचे वाहनतळ गडप, वर्दळीच्या काळात अवजड वाहने रस्त्यांवर
वर्दळीच्या काळात अवजड वाहने रस्त्यांवर

अपघातातील प्राणहानी रोखण्यासाठी हेल्मेट आणि वाहतूक नियमांची सक्ती करणाऱ्या यंत्रणा दुसरीकडे व्यापारी संकुलांच्या वाहनतळ वा तत्सम व्यवस्थेकडे मात्र कानाडोळा करीत आहे. परिणामी, व्यावसायिक महत्व आलेल्या उंटवाडीसह अनेक भागात रस्त्यांवर वाहनतळ तयार होऊन वाहतुकीत अडथळे येतात. वर्दळीच्या काळात अवजड वाहने नियम धाब्यावर बसवून मार्गक्रमण करतात. कुणीही त्यांना रोखत नाही. यंत्रणेचा निष्काळजीपणा अपघातांचा आलेख उंचावण्यास हातभार लावत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>>नाशिक: वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ७० फूट पोहत जाऊन प्रयत्न; महावितरणच्या कर्मचाऱ्याची कामगिरी

सिटी सेंटर मॉलसमोर शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाळूने भरलेल्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार दिलीप हनुमंत भावे (७६) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी रश्मी भावे या थोडक्यात बचावल्या. अवजड वाहनांना शहरात वर्दळीच्या काळात प्रतिबंध आहे. असे असताना वाळूचा डंपर शहरात कसा आला, वाहतूक पोलीस काय करीत होते, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. उंटवाडी सिग्नल ते एबीबी चौक मार्गावर एरवी वर्दळ असते. परिसरात भव्य मॉल, मल्टिप्लेक्स, दागिने, कपडे वा तत्सम बडी दालने असल्याने खरेदीसाठी येणाऱ्यांची गर्दी असते. कृषि प्रदर्शनाने त्यात अधिक भर पडली. संबंधितांकडून चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्यांलगत उभी केली जातात. त्यामुळे प्रचंड कोंडी होते. बडी व्यापारी संकुले व दालनांनी वाहनतळाची व्यवस्था केलेली आहे की नाही, याचा विचारणा कधी यंत्रणेने केलेली नाही. अशा वेळी रस्त्यावरील वाहने उचलून नेण्याची तत्परता दाखविली जाते. त्यातही दुचाकी ज्या तत्परतेने नेली जातात, तितकी तत्परता चारचाकी वाहनांबाबत दिसत नाही. या स्थितीमुळे केवळ सिटी सेंटर मॉलचा परिसरच नव्हे तर, अनेक भाग अपघातप्रवण क्षेत्रात परावर्तीत होण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा >>>नाशिक: गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी – सुषमा अंधारे यांची टीका

गोविंदनगर ते उंटवाडी सिग्नल आणि उंटवाडी सिग्नल ते एबीबी चौक मार्गावर दुतर्फा अनेक व्यापारी संकुले उभी आहेत वा उभे राहत आहे. कुठल्याही व्यापारी वा निवासी बांधकामास परवानगी देताना वाहनतळाची व्यवस्था बंधनकारक असते. मात्र, एकदा ही परवानगी मिळाली की वाहनतळाच्या जागेतही अनधिकृत बांधकाम करण्यास मागेपुढे पाहिले जात नाही. अस्तित्वातील भव्य दालनांबाहेर रस्त्यांवर उभी राहणारी वाहने त्याचे निदर्शक असल्याची साशंकता नागरिक व्यक्त करतात. महापालिकेने आजवर व्यापारी संकुलांनी वाहनतळ गडप केल्याबद्दल कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. अवजड वाहने वर्दळीच्या वेळेत भर दिवसा मार्गक्रमण करीत असताना वाहतूक पोलीस मूग गिळून बसतात. अपघाती मृत्यूंचे कमी करण्यासाठी वाहनधारकांना हेल्मेट सक्तीचा फतवा काढला जातो. मात्र यंत्रणेच्या निष्काळजीपणाने अवजड वाहनांचे मार्गक्रमण, वाहनतळ गडप केल्याने वाहतुकीत अडथळे येऊन अपघात घडत असल्याचा सूर उमटत आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अवजड वाहनांच्या नियमावलीबाबत सोमवारी माहिती दिली जाईल असे सांगितले.

हेही वाचा >>>सुषमा अंधारे यांचे मोठे विधान! शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या “लवकरच…”

समन्वय, इच्छाशक्तीचा अभाव
वाहतुकीच्या प्रश्नांवर महापालिका, वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्यात कुठलाही समन्वय नाही. लोकप्रतिनिधींची अनास्था आहे. यामुळे वाहतुकीच्या समस्या जटील स्वरुप धारण करीत आहेत. बड्या व्यापारी संकुलांना परवानगी देताना महापालिका रस्त्याचे आकारमान, कुठल्या रस्त्यावर किती संकुले हवीत, त्यांचे वाहनतळ आदींचा विचार करते की नाही, हा प्रश्न आहे. वाहनतळाची व्यवस्था न करताच वाहने उचलून नेण्यात धन्यता मानली जाते. अनेक ठिकाणी इमारतींवर इमलेच्या इमले चढविले जातात. वाहनतळाचा विचार होत नाही. इंदूरसारख्या शहरात प्रत्येक सिग्नलवर सीसी टीव्ही यंत्रणा आहे. वाहतूक पोलिसांची गरज पडत नाही. कारण, नियमभंग करणाऱ्या वाहनधारकास लगेच ऑनलाईन दंडाची नोटीस जाते. नाशिक फर्स्ट संस्थेने शहरातील अपघातप्रवण क्षेत्र शोधून त्यांची यादी यंत्रणेला सादर केली होती. त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. द्वारका ते नाशिकरोड उड्डाण पूलाच्या घोषणेला दशकभराचा कालावधी लोटला. पण काहीही झाले नाही. यंत्रणा, लोकप्रतिनिधी वाहतुकीच्या प्रश्नांकडे गांभिर्याने बघत नाहीत.- अभय कुलकर्णी (प्रमुख, नाशिक फर्स्ट)

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 21:35 IST
Next Story
नाशिक: वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ७० फूट पोहत जाऊन प्रयत्न; महावितरणच्या कर्मचाऱ्याची कामगिरी