जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासह अन्य कार्यालयात हेल्मेटशिवाय प्रवेश

नाशिक : सुरक्षित वाहतुकीसाठी हेल्मेटचा वापर वाढविण्यासाठी शहर पोलिसांनी अधिक कठोर पावले उचलली असली तरी अनेक घटकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे पहिल्याच दिवशी उघड झाले.

हेल्मेट न वापरणाऱ्यांना पेट्रोल पंपासह आता शाळा, महाविद्यालय, वाहनतळ, औद्योगिक  वसाहत, शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालय परिसरातही प्रवेश बंदी आहे. तथापि, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासह अनेक कार्यालयांत हेल्मेटविना वाहनधारक ये-जा करीत होते. अनेक आस्थापनांनी मिळकत व्यवस्थापकाची माहिती दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या मोहिमेत अन्य आस्थापनांचे असहकार्य ठळकपणे समोर आले आहे.

हेल्मेट सक्तीच्या पहिल्या दिवशी कुठेही कठोर कारवाई झाली नाही. वाहनधारक व संबंधित आस्थापनांचे समूपदेशन करण्यात आल्याचे वाहतूक शाखेने म्हटले आहे. ज्या आस्थापनांमध्ये हेल्मेटविना प्रवेशास प्रतिबंध आहे. तिथे हेल्मेट नसूनही वाहनधारक मुक्तपणे भ्रमंती करीत होते. या आस्थापनांच्या सहकार्याशिवाय हेल्मेट सक्तीची प्रभावी अमलबजावणी होणार नाही. त्यामुळे मिळकत व्यवस्थापक वा अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त पाण्डय़े यांनी दिला आहे.शहर पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वी पेट्रोल पंपचालकांना विश्वासात घेऊन ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम सुरू केली होती. त्यासाठी प्रत्येक पंपावर पोलीस कर्मचारी तैनात केले. हेल्मेट नसल्यास पेट्रोल भरू देण्यास प्रतिबंध आहे. या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या पंपचालकांना नोटीस बजाविली गेली. यामुळे हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी अनेक वाहनधारक हेल्मेटविना भ्रमंती करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े यांनी हेल्मेट नाही तर सहकार्य नाही या उपक्रमात अतिरिक्त निर्देश दिले होते. हेल्मेटशिवाय वाहनधारकास पेट्रोल पंप परिसरात प्रवेश मिळणार नाही. तसेच इतर आस्थापनांचा परिसर, वाहनतळ या ठिकाणी हेल्मेटविना वाहनधारकांच्या प्रवेशास प्रतिबंध राहणार आहे. पोलीस आयुक्तांचे हे आदेश शहरातील शासकीय व खासगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या आदीपर्यंत लिखीत स्वरुपात पोहोचविण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी सांगितले.

..तर कार्यालय

प्रमुखांवर कारवाई

शहरातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, खासगी शिकवण्या, सर्व वाहनतळ, शासकीय, निमशासकीय कार्यालये, महापालिका, जिल्हा परिषद व इतर कार्यालये, छावणी मंडळ, लष्करी क्षेत्र आदी ठिकाणी हेल्मेटशिवाय प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. या क्षेत्रात हेल्मेटशिवाय दुचाकीस्वार सापडल्यास मालमत्ता अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. शहरातील आस्थापनांनी कार्यालयाचे नांव, मालमत्ता अधिकाऱ्याचे नांव, पद, संपर्क क्रमांक आदी माहिती १५ नोव्हेंबरपूर्वी पोलीस आयुक्तालयास द्यावी. ही माहिती प्राप्त न झाल्यास संबंधित कार्यालयाच्या प्रमुखांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल.

 – दीपक पाण्डय़े (पोलीस आयुक्त, नाशिक शहर)