नाशिक : शहरात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस यंत्रणा विविध पातळीवर प्रयत्न करीत असतानाच नियमांचे पालन करणाऱ्या वाहनधारकांचे अभिनंदन करून प्रोत्साहन दिले जात आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या वतीने हेल्मेट परिधान करून पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनधारकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्य दिनापासून शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल ही मोहीम राबविली जात आहे. तिची अंमलबजावणी करताना पोलीस यंत्रणेसह पंपचालकांना कसरत करावी लागत आहे. या मोहिमेसाठी प्रत्येक पंपावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हेल्मेट नसल्याने पेट्रोल मिळणार नाही हे लक्षात घेऊन वाहनधारकांनी अन्य वाहनधारकांकडून तात्पुरत्या स्वरूपात हेल्मेट मिळवण्याची शक्कल लढविली.

हेल्मेट नसणाऱ्या वाहनधारकांकडून अर्जही भरून घेतला जात आहे. उपनगर पोलीस ठाण्याने उपायुक्त विजय खरात आणि साहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीतील पाच पेट्रोल पंपावर हेल्मेट घालून आलेल्या वाहनचालकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. पोलिसांच्या पाच पथकांनी बिटको पॉइंट, जयभवानी रोड, वडनेर गेट, जेलरोड येथील पेट्रोलपंपांवर हा उपक्रम राबविला. हेल्मेट परिधान करणाऱ्यांचे अभिनंदन केल्याने हेल्मेट न घालणाऱ्यांनाही सूचक संदेश दिला गेला.

नाशिकरोडच्या प्रत्येक पेट्रोल पंपावर एक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. बिटको पेट्रोलपंपावर काही वाहनधारकांनी मुखपट्टी परिधान केलेली नव्हती. संबंधितांना मुखपट्टीचे वितरण करण्यात आले. दरम्यान, नो हेल्मेट, नो पेट्रोल अभियाना अंतर्गत उपनगर पोलीस ठाण्याला ८८ हेल्मेट मिळाली आहेत. रस्ते अपघातातील मृतांचे नातेवाईक  विशाल वर्मा, भरत नागरे, मिलिंद गायकवाड यांना साहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले.