जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी ४४०० हजारांपेक्षा अधिक दरवाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याने तब्बल दोन महिन्यानंतर उच्चांक केला. दुसरीकडे, चांदीनेही चार हजारांपेक्षा अधिक दरवाढ झाल्यानंतर दोन लाखांवर झेप घेऊन ऐतिहासिक उच्चांकाचा टप्पा गाठला. दोन्ही धातुंच्या दरांनी नवा इतिहास रचल्याने ग्राहकांसह व्यावसायिक चांगलेच धास्तावले.
सुवर्ण बाजारपेठेत काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमती सतत वाढत आहेत. आजही दोन्ही धातुंच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली. शुक्राच्या हस्तामुळे लग्न सराईला ब्रेक लागलेला असला, तरी त्याचा थेट परिणाम सोने आणि चांदीच्या खरेदीवर दिसून आलेला नाही आहे. सराफा बाजारात सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडत आहेत. दोन्ही धातुंमध्ये घट होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. शुक्रवारी देखील परिस्थिती तशीच राहिली आहे. चांदीने नवीन उंची गाठली आहे. तर सोने देखील बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे जात आहे. सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, भविष्यातही दोन्ही धातुंचे भाव चढेच राहतील.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ०.२५% कपात केल्यानंतर, गुंतवणूकदारांनी सुरक्षित आश्रयस्थान असलेल्या मालमत्तेची म्हणजेच सोन्याची खरेदी वाढवली आहे. कमी व्याजदरांमुळे बाँड उत्पन्न कमी होते, ज्यामुळे गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित पर्याय मानतात आणि त्याची मागणी वाढते. या वर्षी आतापर्यंत देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती ६७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तज्ज्ञांचा अंदाज आहे, की जर जागतिक वातावरण स्थिर राहिले किंवा रुपया कमकुवत झाला तर सोने २०२६ पर्यंत आणखी ५ ते १५ टक्के महाग होऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही आतापर्यंत सोन्याच्या दरात सुमारे ६० टक्के वाढ झाली आहे.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेतही गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ४१२ रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने प्रति १० ग्रॅम एक लाख ३२ हजार ४५८ रुपयांपर्यंत पोहोचले होते. शुक्रवारी दिवसभरात आणखी ४४२९ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३६ हजार ८८७ रुपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचले. दिवाळीपूर्वी १७ ऑक्टोबरला २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३५ हजार ४४५ रूपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर आता सोन्याने नवा उच्चांक केला आहे.
चांदीत ४१२० रूपयांनी वाढ
शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरूवारी चांदीच्या दरात सकाळी बाजार उघडल्यावर कोणतीच वाढ अथवा घट नोंदवली गेली नाही. मात्र, दिवसभर स्थिर राहिलेल्या चांदीच्या दराने रात्री उशिरा बाजार बंद होईपर्यंत प्रति किलो ५१५० रूपयांची उसळी घेतली होती. त्यामुळे चांदीने तीन टक्के जीएसटीसह एक लाख ९८ हजार ७९० रूपयांचा ऐतिहासिक उच्चांक केला होता. शुक्रवारी दिवसभरात पुन्हा ४१२० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदीच्या दराने जीएसटीसह प्रति किलो दोन लाख दोन हजार ९१० रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक केला.
