जळगाव : राज्यात सर्वाधिक वेगाने विकसित होण्याचा बहुमान मिळालेल्या जळगाव विमानतळावरून आतापर्यंत मुंबई, पुणे, गोवा, हैदराबाद आणि अहमदाबाद शहरांसाठी विमानसेवा सुरू होती. त्यानंतर आता जळगाव ते इंदूर विमानसेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या सेवेचा मुहूर्त सुद्धा निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे.

केंद्र सरकारने सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने जळगाव विमानतळाच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना आता मिळणार आहे. केंद्राच्या निधीतून विमानतळावरील ॲप्रनचा विस्तार करण्यात येणार असून, त्यामुळे एकाच वेळी दोन एटीआर-७२ आणि एक लेगसी-६५० प्रकारची विमाने पार्क करता येणार आहेत. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता विमानतळावर आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी नवी टर्मिनल इमारत उभारण्यात येणार आहे. या टर्मिनलमध्ये सुमारे १५० प्रवाशांसाठी आरामदायी बैठक व्यवस्था, प्रतीक्षागृह, अद्ययावत सुरक्षा यंत्रणा तसेच आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध असतील. यासोबतच टर्मिनल इमारतीसमोर सुमारे १०० वाहनांच्या क्षमतेचा प्रशस्त वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहन पार्किंगची अडचण भासणार नाही. या विकास कामांमुळे जळगाव विमानतळाची क्षमता वाढून हवाई वाहतुकीत सुधारणा होणार असून, खान्देशातील औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठा फायदा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दोन महिन्यांपूर्वीच नियोजन

नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर व दक्षिण भारतातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी जळगाव विमानतळ उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने प्रवासी सुविधा, नियमित उड्डाणांचे नियोजन आणि आवश्यक पायाभूत सज्जता यांचा सखोल विचार करून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दोन महिन्यांपूर्वी जळगाव विमानतळावर महत्त्वपूर्ण प्रशासकीय बैठक घेतली होती. या बैठकीत फ्लाय ९१ या विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत देशातील इंदूर, जयपूर–उदयपूर मार्गे हेंडन (गाझियाबाद) तसेच दिल्लीसाठी प्रवासी विमानसेवा आणि कार्गो सेवा सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. जळगाव विमानतळाची भौगोलिक स्थिती, वाढती प्रवासी मागणी आणि कुंभमेळ्याच्या काळातील संभाव्य वाहतूक लक्षात घेता या सेवांना अनुकूलता असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले होते. त्या बैठकीची फलश्रुती म्हणून आता पहिल्या टप्प्यात थेट जळगाव ते इंदूर विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात येत आहेत.

प्रवासभाडे अडीच हजारापर्यंत ?

संबंधित यंत्रणांकडून आवश्यक परवानग्या, वेळापत्रक आणि प्रवासी सुविधा याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. जळगाव ते इंदूर सेवा सुरू झाल्यास जळगावहून साधारणपणे एक ते दीड तासांत इंदूर पोहचता येईल. फ्लाय ९१ विमान कंपनीने जळगाव ते इंदूर विमानसेवा लवकरच सुरू होणार असल्याचे जाहीर सुद्धा केले आहे. फ्लाय ९१ कंपनीने नवीन विमान खरेदी केले असून, ते दाखल झाल्यावर हैदराबाद–जळगाव–इंदूर, या मार्गाचा समावेश असणार आहे. इंदूरची विमानसेवा नियमित झाल्यानंतर प्रवाशांचे रेल्वेसह खासगी प्रवासी गाड्यांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होण्याची आशा आहे. एप्रिलपासून प्रत्यक्षात येण्याची चिन्हे असलेल्या जळगाव–इंदूर विमानसेवेचे प्रवासभाडे साधारण अडीच हजार रुपयांपर्यंत असू शकेल.