नाशिक -शैक्षणिक विश्वातील महत्वाचे वळण असलेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेस मंगळवारपासुन आरंभ झाला. परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहचण्यासाठी पालक तसेच विद्यार्थ्यांची लगबग पाहण्यासारखी राहिली. याआधीही शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा दिली असली तरी बारावीच्या परीक्षेचा ताण विद्यार्थी तसेच पालकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. कॉपी मुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळाने कठोर पाऊले उचलली असल्याचा दावा होत असला तरी यंदा परिक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयात जळगावमध्ये चार कॉपीबहाद्दर आढळले. तर नाशिक, धुळे, नंदुरबार विभागाचा अहवाल या बाबत निरंक राहिला.
मंगळवारी बारावीच्या लेखी परीक्षेला सुरूवात झाली. नाशिक विभागात २८५ केंद्रावर एक लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून सामोरे जात आहे. परीक्षेसाठी जिल्हा परिसरातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालक नियोजित वेळेआधी पोहचले. पालकांच्या सुचनांचा भडीमार आणि परीक्षेचा ताण यामुळे काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ताण जाणवला तर काहींचा जे होईल ते पाहुन घेऊ अशा बेफिकरीत राहिले. यंदा शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या मदतीने कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली. जिल्हातील संवेदनशील, अतिसंवेदनशील आणि उपद्रवी परीक्षा केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
केंद्राच्या बाहेर चित्रीकरण करण्यात येत आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या आत बैठे पथक लक्ष ठेवणार असून नऊ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय केंद्राच्या परीसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात आली. भरारी ही पथके मंगळवारी दिवसभर जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राना भेटी देत असून दक्षता समितीची भरारी पथकेही कोणतीही पूर्व सुचना न देता आक्सिमतपणे परीक्षा केंद्राना भेटी देणार आहे. ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नसेल ती केंद्र पुढील वर्षापासून बंद केली जातील. नाशिक विभागातील २८५ पैकी २६२ केंद्रावर सीसीटीव्ही आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण, महसुल, जिल्हा परिषद संलग्न विभाग प्रयत्न करत आहे.
दरम्यान, नाशिक विभागात धुळे, नंदुरबार आणि नाशिक विभागात एकही विद्यार्थी कॉपी करतांना आढळला नाही. तर जळगाव विभागातील पाचोरा येथे चार विद्यार्थी कॉपी करतांना आढळले. दुसरीकडे परीक्षा सुरू होतांना तसेच परीक्षा संपल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर वाहने, विद्यार्थी पालक यांच्या मुळे वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. थोड्याच वेळात दुपारच्या सत्रातील शाळा, महाविद्यालय भरल्याने वाहतुक कोंडीत भर पडली.
