नाशिक – राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने शनिवारी बारावी परीक्षेचा निकाल जाहिर झाला. सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९४.१४ टक्के तर लातुर विभागाचा सर्वात कमी म्हणजे ८४.१४ टक्के निकाल लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल ९०.७२ टक्के लागला आहे. एकुण निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान, यंदा गुणपत्रक तसेच गुणवत्तापत्र हे एकत्र छापील स्वरूपात देण्यात येणार आहे. मात्र लिखीत स्वरूपात तो हाती कधी येईल अद्याप त्याची तारीख निश्चत झालेली नाही.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागीय मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत पार पडली. फेब्रुवारी-मार्च मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शनिवारी जाहिर झाला. नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.

यंदा नाशिक विभागातून एक लाख ६२, ९१४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यातील एक लाख ६१,८१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील एक लाख ४६,७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून नाशिक विभागाचा निकाल ९०.७२ टक्के लागला. तसेच विभाग निहाय विचार केला तर नाशिक ९३.४४ टक्के, धुळे ८९.६७ टक्के, जळगाव ८५.०८ आणि नंदुरबार ९४.६६ टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकालाची टक्केवारी अंशत ०.५९ टक्के घसरली आहे.

दरम्यान, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी -मार्च २०२६ साठी प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदल माहितीची प्रत घेता येईल. त्याच प्रमाणे डिजीलॉकर ॲप मध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

संपामुळे लिखीत निकाल हाती येण्यास उशीर

राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत संप पुकारला होता. याचा फटका निकाल लेखी स्वरूपात येण्यावर होणार आहे. यंदा निकाल पत्रक आणि प्रमाणपत्र एकत्रित मिळणार आहे. मात्र संपामुळे हे काम रेंगाळले असून छपाई, टंकलेखन करण्यास उशीर होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर लिखीत स्वरूपात निकाल हाती येण्यास विलंब होईल.

राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने तणाव मुक्तीसाठी मदतवाहिनी

राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल जाहिर झाला. निकाल जाहिर झाल्यानंतर अपेक्षित यश न मिळाल्यास विद्यार्थ्यांकडून टोकाची भूमिका घेतली जाते. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाच्या वतीने निकाल जाहिर झाल्या पासून पुढील आठ दिवस ही विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी मदतवाहिनी सकाळी आठ ते रात्रीचे आठ या कालावधीत सुरू राहिल. विद्यार्थ्यांनी ९९६०६४४४११, ८१६९२०२२१४, ८४२११५०५२८, ७९७२५७३७४३ या क्रमांकावर संपर्क साधावा.